मोशीत दोन लाखांचा गांजा जप्त
By admin | Published: June 27, 2017 07:35 AM2017-06-27T07:35:37+5:302017-06-27T07:35:37+5:30
मोशी येथील देहूफाटा चौकातून सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एक संशयास्पद वाहन अडवून त्यातील
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मोशी येथील देहूफाटा चौकातून सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एक संशयास्पद वाहन अडवून त्यातील १२ किलो बेकायदा गांजा साठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन शिंदे (वय ३१, रा. खेड, शिवापूर), प्रफुल्ल मारुती सुर्वे (वय ३०), विकास कोंडे (वय २३) अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही राहणारे खेड शिवापूरचे असून बेकायदा गांज्याचा साठा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गस्तीवरील पोलीस पथकाला मोशीतून जात असलेल्या एका वाहनाबद्दल संशय आला. संगमनेरहून मोशी मार्गे खेडशिवापूरला जात असलेल्या या मोटारीला (वाहन क्रमांक एमएच १२ एनयू ४२१३) पोलिसांनी अडविले. तपासणी केली असता मोटारीत २ लाख रुपये किमतीचा १२ किलो वजनाचा गांजा आढळून आला. सचिन शिंदे हा मोटारीचा मालक असून तो ग्रामीण भागात गांजा विक्रीचे काम करतो, असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.