मनोरुग्णालयातून पळालेल्या दोघांना भोर येथून केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 11:39 PM2018-07-07T23:39:56+5:302018-07-07T23:40:09+5:30
येरवडा कारागृहातील दोघा गुन्हेगारांना उपचारासाठी येरवडा येथील मनोरुग्णालयात ठेवले असताना तेथील कर्मचा-यांना मारहाण करुन पळून गेलेल्यांना खडकी पोलिसांनी भोर येथून अटक केली आहे.
पुणे - येरवडा कारागृहातील दोघा गुन्हेगारांना उपचारासाठी येरवडा येथील मनोरुग्णालयात ठेवले असताना तेथील कर्मचा-यांना मारहाण करुन पळून गेलेल्यांना खडकी पोलिसांनी भोर येथून अटक केली आहे. संतोष सुदाम बाबर आणि उदय गुहाराम बंजारे उर्फ उदया काटकर अशी त्यांची नावे आहेत.
संतोष बाबर याला चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दी २०१६ मध्ये झालेल्या खुन प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. उदय बंजारे याला देहुरोड पोलीस ठाण्यातील अपहरणाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे़ या दोघांना उपचारासाठी येरवडा येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ ५ जुलै रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान दोघांनी चहा घेतला़ त्यानंतर उदय वंजारे याने लालसिंग वाघमारे यांना मला फोनवर बोलायचे आहे, असे म्हणाला़ फोनवर बोलायला परवानगी नाही असे त्यांनी सांगितल्यावर तो निघून गेला़. थोड्या वेळाने वाघमारे हे फोनवर बोलत असताना तो पाठीमागून आला व त्याने वाघमारे यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले़ त्यांच्या मदतीला आलेले सतीश रणपिसे यांच्या डोक्यावर व दोन्ही हातावर बांबुने मारुन जखमी केले़ ते खाली पडल्यावर त्यांच्या खिशातील मेनगेटच्या चाव्या घेऊन जात असताना फोनवर बोलत असलेल्या सिस्टर रुपाली विजय अधिकारी यांचा मोबाईल घेऊन आपटून फोडला़ त्यानंतर मेनगेटचे कुलूप काढून गेटला बाहेरुन कुलूप लावून दोघेही जण पळून गेले. याप्रकरणी लालसिंग वाघमारे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़.
खडकी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एऩ व्ही़ महाडिक यांना त्यांचे बातमीदारांमार्फत या आरोपींची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, करपे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महाडिक, अरक लक्ष्मण बांगर, बाबा शिर्के, पोलीस हवालदार गुरव, लोखंडे यांनी भोर येथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले़ त्यांना येरवडा पोलिसांच्या हवाली केले आहे.