आता लागणार ‘सुगावा’; शहर पोलिस दलात दोन नवीन अधिकारी दाखल

By नारायण बडगुजर | Published: September 14, 2023 07:22 PM2023-09-14T19:22:17+5:302023-09-14T19:22:29+5:30

पुणे शहर पोलिस दलाकडील पथकावर अवलंबून रहावे लागत होते.

Two new officers inducted into the city police force | आता लागणार ‘सुगावा’; शहर पोलिस दलात दोन नवीन अधिकारी दाखल

आता लागणार ‘सुगावा’; शहर पोलिस दलात दोन नवीन अधिकारी दाखल

googlenewsNext

पिंपरी : विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी श्वान पथकांची मदत घ्यावी लागते. त्यासाठी पुणे शहर पोलिस दलाकडील पथकावर अवलंबून रहावे लागत होते. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी दोन श्वान उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आता गुन्ह्यांचा जलद सुगावा लागण्यास मदत होणार आहे. ‘सिम्बा’ आणि ‘जेम्स’ अशी या दोन नवीन अधिकाऱ्यांची नावे आहेत. 

वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. पाच वर्षांनंतरही पोलिस आयुक्तालयाला अनेक बाबींची पुर्तता करण्यात आलेली नाही. वरिष्ठ पातळीवर यासाठी पाठपुरावा सुरू असून एका पाठपुराव्याला यश आले. श्वान पथकाच्या निमित्ताने दोन श्वान अधिकारी शहर पोलिस दलात दाखल झाले.

‘सिम्बा’ हा श्वान गुन्ह्यांशी निगडीत काम करणार आहे. चोरी, घरफोडी, खून यांसारख्या गुन्ह्यांच्या घटनास्थळी जाऊन आरोपींचा माग काढणे, हे त्याचे मुख्य काम असणार आहे. गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी सिम्बा कटिबद्ध आहे. ‘जेम्स’ हा श्वान बॉम्ब शोधक नाशक पथकात (बीडीडीएस) काम करणार आहे. सिम्बा सोबत दोन आणि जेम्ससोबत दोन असे एकूण चार हॅंडलर आहेत. प्रत्येक हॅंडलर त्यांची १२-१२ तास काळजी घेईल. त्यांचे डाएट, व्यायाम, प्रशिक्षण, औषधे अशा प्रत्येक गोष्टीची काळजी हे हॅंडलर घेणार आहेत. पोलिस दलात असणाऱ्या श्वानांना सुरुवातीपासून जो हॅंडलर सांभाळतो, त्याचेच ते ऐकतात. त्यामुळे हे श्वान जिथे जातात तिथे त्यांचे हॅंडलर सावलीप्रमाणे सोबत असतात.

पिंपरी-चिंचवड पोलिसांना अनेक गुन्ह्यात पुणे शहर पोलिसांच्या श्वान पथकाची मदत घ्यावी लागत होती. त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी देखील अनेकदा निर्माण झाल्या होत्या. पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात नवीन दोन श्वान दाखल झाल्याने अनेक गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना मोठी मदत होणार आहे.

लोकमतचा पाठपुरावा
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी साधनसामुग्रीसह मनुष्यबळ तसेच विविध पथकांची आवश्यकता आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने सविस्तर बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. आयुक्तालयासाठी श्वान पथक आवश्यक असल्याचेही वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. 

आयुक्तालयासाठी श्वान पथक पाहिजे असल्याबाबत वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार पुणे शहर पाेलिस दलाकडील श्वान पथकातील दोन श्वान कायमस्वरुपी पिंपरी-चिंचवडसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. - विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Web Title: Two new officers inducted into the city police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.