दोन परिचारिका अखेर निलंबित
By admin | Published: June 16, 2017 04:48 AM2017-06-16T04:48:57+5:302017-06-16T04:48:57+5:30
लसीकरण मोहिमेतील गैरवर्तन दोन परिचारिकांना भोवले आहे. त्यांची रुग्णाप्रति असणारी अनास्था, रुग्णसेवेस बाधक वर्तन यामुळे सेवा निलंबनाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : लसीकरण मोहिमेतील गैरवर्तन दोन परिचारिकांना भोवले आहे. त्यांची रुग्णाप्रति असणारी अनास्था, रुग्णसेवेस बाधक वर्तन यामुळे सेवा निलंबनाची कारवाई करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. मंगला मॅन्युअल गायकवाड आणि कविता दादाराव शिरसाठ अशी या परिचारिकांची नावे आहेत.
जिजामाता रुग्णालयात या दोघींची नेमणूक करण्यात आली. त्यातही मंगला गायकवाड यांच्याकडे भाटनगर दवाखान्यातील आयएलआर व्हॅक्सीन व्यवस्थापनाचे, तर
शिरसाठ यांच्याकडे तेथीलच नियमित व बाह्य लसीकरण, इंद्रधनुष्य शिबिर, पल्स पोलिओ लसीकरण, जननक्षम जोडपी सर्वेक्षण, सुरक्षित मातृत्व अभियान आदी कामकाज सोपविले. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत मोहीम राबविण्यात आली.
मोहिमेदरम्यान राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणेचे
डॉ. पंकज खाडे निरीक्षणासाठी आले असता दोघींच्या
कामकाजात त्यांना हलगर्जीपणा दिसून आला. तसा अहवाल डॉ. खाडे यांनी १३ मे २०१७ रोजी सादर केला.
या गैरवर्तनामुळे शासन स्तरावर महापालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे, असा आरोप ठेवला आहे. रुग्णसेवेस बाधक वर्तनाबद्दल निलंबनाची कारवाई केली आहे.