गणेश नाणेकर खुनी हल्ला प्रकरणी दोन जणांना अटक
By Admin | Published: March 5, 2017 09:11 PM2017-03-05T21:11:41+5:302017-03-05T21:11:41+5:30
मागील आठवड्यात झालेल्या नाणेकरवाडी येथील गणेश संभाजी नाणेकर उर्फ महाराज यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला प्रकरणी
>ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. 5 - मागील आठवड्यात झालेल्या नाणेकरवाडी येथील गणेश संभाजी नाणेकर उर्फ महाराज यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला प्रकरणी येथील दोन जणांना चाकण पोलिसांनी अटक केली असून गुन्हेगारी क्षेत्रातील अंतर्गत स्पर्धेतून वरचढ झालेल्या महाराज यांचा काटा काढण्याच्या हेतूने त्यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी येथील गणेश संभाजी नाणेकर ( महाराज ) यांच्यावर मागील आठवड्यात २४ फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास तलवार, चाकू व चॉपरने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या प्राणघातक हल्ल्यात जबर जखमी झालेल्या गणेश याच्यावर चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी चाकण पोलिसांनी मौंटी उर्फ संकेत जगदीश नाणेकर ( वय १९ रा. नाणेकरवाडी, चाकण ) व भीम पालखी कुशवाह ( वय १९ रा .नाणेकरवाडी, चाकण ) या दोन तरुणांना अटक केली असून तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. अटक केलेले तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून अनेक गंभीर गुन्ह्यात संशयित असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दिनांक ४ रोजी चाकण जवळील वाघे वस्ती व नाणेकरवाडी येथे सापळा लावून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भादवी कलम ३०७, ३४, आर्म ऍक्ट ४ ( २५) ( २७ ) वाढीव कलम १२० ( बी ) हा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, पोलीस हवालदार रमेश नाळे, दत्तात्रय जाधव, एस. आर. जरे, अजय भापकर, अशोक साळुंके, हवालदार सातकर यांनी याचा छडा लावून तपास केला.