दहशत माजवणाऱ्या रावण टोळीतील दोघांना पिस्तुलसह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 05:20 PM2018-09-24T17:20:44+5:302018-09-24T17:23:40+5:30
चिंचवड आणि देहूरोड परिसरात दहशत माजवणाऱ्या रावण साम्राज्य टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी : चिंचवड आणि देहूरोड परिसरात दहशत माजवणाऱ्या रावण साम्राज्य टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअटक केली आहे. ऋतिक रोकडे (वय २०, रा. चिंतामणीनगर, चिखली) आणि सचिन लोखंडे (वय २१, रा. भाऊसाहेब रोकडे चाळ चिखली) या सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे असा ५१ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोलीस नाईक डी.जे.जगताप यांना दि.२२ सप्टेंबर रोजी माहिती मिळाली की, रावण साम्राज्य टोळीतील सदस्य त्यांच्याकडील पिस्तुल मोक्काच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या त्यांच्या मित्रास देण्यासाठी निगडी येथील अंकुश चौकात वाट बघत थांबले आहेत. अशी माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहा. पोलीस आयुक्त सतिश पाटील व पोलीस निरिक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी तातडीने पुढील कारवाईच्या सुचना दिल्या. त्यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक दिपाली मरळे यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना सापळा रचून निगडीतून अटक केले. त्यावेळी त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
त्यांच्याविरूध्द निगडी, वाकड, चाकण, चिंचवड, बंडगार्डन पोलीसांत गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.