धाडगेवस्तीवर राणूबाईमळा रस्त्यावर दोन जणांवर तलवार व लाकडी दांडक्याने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 08:29 PM2018-04-18T20:29:18+5:302018-04-18T20:29:18+5:30
धाडगेवस्ती येथे चाकण-राणूबाई मळा रस्त्यावर तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून दोघांना जखमी केल्या प्रकरणी राणूबाई मळ्यातील तीन जणांवर आज ( दि. १८ ) रात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.
चाकण - धाडगेवस्ती येथे चाकण-राणूबाई मळा रस्त्यावर तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून दोघांना जखमी केल्या प्रकरणी राणूबाई मळ्यातील तीन जणांवर आज ( दि. १८ ) रात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना मंगळवारी ( दि. १७ ) रात्री पावणेसातच्या सुमारास धाडगेवस्ती रोडवर घडली. या घटनेत अक्षय बिरदवडे व संतोष बिरदवडे हे जखमी झाले आहेत.ओंकार दत्तात्रय बिरदवडे ( वय २१, रा. राणूबाईमळा, चाकण ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आकाश लेंडघर, प्रतीक लेंडघर व सूरज लेंडघर ( सर्व रा. राणूबाईमळा, चाकण ) या तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८५/२०१८, भादंवि कलम ३४१, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४, ४२७, आर्म ऍक्ट ४ व २७ अन्वये आज रात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, मंगळवार ( दि. १७ ) रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास धाडगेवस्ती येथील ओढ्याजवळ फिर्यादी ओंकार व त्याचा चुलत भाऊ प्रवीण हे दोघे दुचाकी क्रमांक ( एमएच १४ एफ व्ही ५८३८ ) वरून घरी जात असताना आकाश लेंडघर व प्रतीक लेंडघर यांनी संगनमताने त्यांच्या दुचाकीला दुचाकी आडवी मारून पुढे जाण्यास प्रतिबंध करून शिवीगाळ व दमदाटी केली. प्रतीक याने त्याच्या हातातील तलवारीने ओंकार च्या पाठीवर व प्रवीणच्या कानावर, कानामागे वार करून जखमी केले. व दुचाकीवर दगड टाकून दुचाकीचे नुकसान केले. यावेळी भांड सोडविण्यासाठी आलेले संतोष बिरदवडे व अक्षय बिरदवडे यांना आकाश, प्रतीक व सुरज यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्रतीक याने तलवारीने अक्षयच्या हाताच्या मनगटावर व संतोषच्या कानावर हाताच्या बोटावर वार करून जखमी केले. सदर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार पुढील तपास करीत आहेत.