इंद्रायणी नदीच्या पात्रात दोघे गेले वाहून, अल्पवयीन मुलाला वाचविण्यात स्थानिकांना यश; कुंडमळा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 07:34 PM2021-06-28T19:34:54+5:302021-06-28T19:36:20+5:30

शेलारवाडीजवळ असणाऱ्या कुंडमळा येथील नदीपात्रात असणाऱ्या कुंडमाता मंदिराजवळ तीनजण पर्यटनासाठी आले होते.

The two person were swept away in the Indrayani river, the locals succeed in rescuing the minor boy, incident in the kundmala | इंद्रायणी नदीच्या पात्रात दोघे गेले वाहून, अल्पवयीन मुलाला वाचविण्यात स्थानिकांना यश; कुंडमळा येथील घटना

इंद्रायणी नदीच्या पात्रात दोघे गेले वाहून, अल्पवयीन मुलाला वाचविण्यात स्थानिकांना यश; कुंडमळा येथील घटना

googlenewsNext

गहुंजे : शेलारवाडी जवळील कुंडमळा येथील इंद्रायणीनदी परिसरातील रांजण खळगे भागात  पर्यटनासाठी आलेले दोघे  सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास नदीपात्रात पडल्याने वाहून गेले असून एकाचा मृतदेह काढण्यात यश आले आहे. दुसऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. नदीपात्रात पडलेल्या एका अल्पवयीन मुलाला स्थानिक नागरिकांनी वाचविले असून तो सुखरूप असल्याचे सांगण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.        

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलारवाडीजवळ असणाऱ्या कुंडमळा येथील नदीपात्रात असणाऱ्या कुंडमाता मंदिराजवळ तीनजण पर्यटनासाठी आले होते.  यावेळी  वैष्णव विनायक भोसले वय ( वय ३०, रा . दांगट वस्ती, देहूरोड ) व आयुष राकेश नरवडे (वय अंदाजे ७ ते ८ वर्ष , रा मोशी, पुणे) हे मामा-भाचे दोघे पाण्याच्या प्रवाहाजवळ मोबाईलवर फोटो काढत होते. त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने ते दोघेही वाहत्या पाण्यात पडले होते. त्यांना वाचविण्यासाठी आयुष याचे वडील  राकेश लक्ष्मण नरवडे (वय ३६ , रा मोशी, पुणे) यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही वाहून जात असताना कुंडमळा येथील स्थानिक युवकांनी वाहत्या प्रवाहात उड्या मारुन तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. आयुष नरवडे या लहान मुलाला वाचविण्यात यश आले आहे. त्यावेळी वैष्णव भोसले व राकेश नरवडे हे दोघे मेहुणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून वैष्णव भोसले यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे. 

     

दरम्यान, नदीच्या वाहत्या पाण्यात वाहून गेलेल्या राकेश नरवडे यांना शोधण्यासाठी दुपारपासून प्रयत्न सुरु असून अदयाप यश आलेले नाही. सुदुंबरे येथील एनडीआरएफला पाचारण करण्यात आले असून  त्यांच्या पथकामार्फत शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी सांगितले आहे.

Web Title: The two person were swept away in the Indrayani river, the locals succeed in rescuing the minor boy, incident in the kundmala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.