बुलेट चोरी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात ; २० लाख ५० हजारांच्या १५ दुचाकी हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 07:11 PM2021-01-25T19:11:53+5:302021-01-25T19:12:55+5:30
पिंपरी - चिंचवड, पुणे जिल्हा, नवी मुंबई, ठाणे परिसरातून चोरून आणून विक्रीसाठी ठेवलेल्या १३ बुलेट व दोन अन्य दुचाकी अशा एकूण २० लाख ५० हजार रुपये किमतीच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या...
पिंपरी : दुचाकी चोरीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. त्यातही महागड्या गाड्या चोरीला जात आहेत. अशाच पध्द्धतीने बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनीअटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख ५० हजारांच्या १३ बुलेट आणि दोन अन्य दुचाकी हस्तगत केल्या. पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
विशाल बाळासाहेब मगर (वय २०, रा. लेहणेवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर), विशाल बंकट खैरे (वय २१, रा. भुतडाता, जामखेड, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा मुख्य साथीदार अमोल शिवाजी ढोबळे (रा. घाटकोपर, मुंबई) याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरी रोखण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज व घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल ढोबळे हा बुलेट दुचाकी चोरी करीत असल्याचे आढळले. अमोल याने चोरलेली एक बुलेट विकण्यासाठी त्याचे दोन साथीदार मोशी टोलनाका परिसरात येणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. २४) सापळा लावून आरोपी मगर आणि खैरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक बुलेट आढळली. ती बुलेट त्यांचा मित्र ढोबळे याने चोरी करून त्यांना विक्रीसाठी दिली असून ढोबळे याने १२ बुलेट व इतर दोन दुचाकी जामखेड येथे विक्रीकरीता ठेवल्याचेही आरोपींनी पोलिसांना सांगितले.
पिंपरी - चिंचवड, पुणे जिल्हा, नवी मुंबई, ठाणे परिसरातून चोरून आणून विक्रीसाठी ठेवलेल्या १३ बुलेट व दोन अन्य दुचाकी अशा एकूण २० लाख ५० हजार रुपये किमतीच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या. याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील चाकण, भोसरी एमआयडीसी, भोसरी, पिंपरी, हिंजवडी, पुणे ग्रामीण हददीतील राजगड, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हददीतील नेरळ, एपीएमसी, रबाळे, तसेच ठाणे शहर हददीतील कापुरबावडी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, गिरीश चामले, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, यदू आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, योगेश्वर कोळेकर, नाथा केकान, राजकुमार हनमंते, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ, शशिकांत नांगरे, राहुल सूर्यवंशी, प्रमोद ढाकणे, जगदीश बुधवंत, गजानन आगलावे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
तपास पथकाचा सन्मान
आरोपी अमोल ढोबळे याचा पोलीस शोध घेत आहेत. गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी विशाल मगर याच्यावर यापूर्वी जामखेड येथे गुन्हा दाखल आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्यांची माहिती घेऊन त्याबाबत तपास करण्यात येत आहे, असे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. तसेच बुलेट व इतर महागड्या दुचाकी चोरीच्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकातील तीन अधिकाऱ्यांना प्रशंसा पत्र प्रदान करून कृष्ण प्रकाश यांनी सन्मानित केले. या पथकाला रिवाॅर्ड देखील देण्यात येणार आहे.