थेरगावला पवना नदीत दोन जण बुडाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 07:53 AM2021-03-15T07:53:52+5:302021-03-15T07:54:07+5:30
पिंपरी : चिंचवड येथून पवना नदीतून थेरगाव येथे येणाऱ्या चार जणांपैकी दोघे बुडाल्याची शक्यता आहे. यातील दोघे बचावले असून ...
पिंपरी : चिंचवड येथून पवना नदीतून थेरगाव येथे येणाऱ्या चार जणांपैकी दोघे बुडाल्याची शक्यता आहे. यातील दोघे बचावले असून दोन जणांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.
रवी राजकुमार गायकवाड (वय १३), नरसिंग महादेव जाधव (वय २१, दोन्हीही रा. काळेवाडी), असे बचावलेल्या दोघांची नावे आहेत. तर पिंटू विठ्ठल गायकवाड (वय ३५), ओम प्रकाश जाधव (वय २५, दोन्हीही रा. काळेवाडी), असे शोध सुरू असलेल्या दोघांची नावे आहेत.
वाकडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी गायकवाड, नरसिंग जाधव, पिंटू गायकवाड आणि ओम जाधव हे चौघेही रविवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंचवड येथून पवना नदी पात्रातून थेरगाव येथील स्मशानभूमीजवळ येत होते. चौघांनाही पोहता येत असल्याने ते पोहत येत होते. त्यात रवी गायकवाड व नरसिंग जाधव हे नदी पात्रातून सुरक्षीत बाहेर आले. मात्र पिंटू गायकवाड आणि ओम जाधव हे नदी पात्रातून बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध सुरू केला. तसेच याबाबत पोलीस व अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानुसार पोलीस तसेच महापालिकेच्या पिंपरी व रहाटणी केंद्रातील दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन बोटींच्या साह्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध घेतला. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.
थेरगाव येथे पवना नदी पात्रात गाळाचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे दोघे तेथे बुडाले असल्याची शक्यता आहे, असे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.