पुण्यात सापळा रचून पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला घेतलं ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 10:47 AM2021-09-24T10:47:30+5:302021-09-24T10:57:44+5:30
पिंपरी: शहरात सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकून त्याच्याकडून दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी ही ...
पिंपरी: शहरात सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकून त्याच्याकडून दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी ही कारवाई केली. प्रताप उर्फ बाळ्या हनमंत पवार (वय २९, रा. पिरंगुट, ता. मुळशी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. लातूर येथील गुन्ह्यातील फरार असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार बावधन येथे येणार असून त्याच्या जवळ पिस्तूल आहे, अशी माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून बावधन रोड, पुणे येथून आरोपी पवार याला पकडले. त्याच्या ताब्यातून ४० हजार ४०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोज जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
आरोपीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडी दरम्यान पोलिसांनी चौकशी केली. तसेच आरोपी पवार याच्याकडून ४० हजार २०० रुपये किमतीचे देशी बनावटीचे आणखी एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीकडून एकूण ८० हजार ६०० रुपये किमतीचे दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. आरोपी पवार हा पोलीस रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात यापूर्वी दरोड्याचे दोन, अग्निशस्त्राचा एक असे गुन्हे दाखल आहेत. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील दाखल खुनाचा प्रयत्न व जामखेड पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात तो सात महिन्यांपासून फरार आहे.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, शाकिर जिनेडी, सहायक उपनिरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस कर्मचारी सुनील कानगुडे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, संदीप पाटील, शैलेश मगर, किरण काटकर, सुधीर डोळस, अशोक गारगोटे, निशांत काळे, गणेश गिरीगोसावी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.