पिंपरी महापालिका भवन, वल्लभनगरातील दोन जागा महामेट्रोला ३० वर्षे भाडेतत्वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:31 PM2020-10-07T12:31:21+5:302020-10-07T12:32:07+5:30
दापोडीच्या हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपूल या साडेसात किलोमीटर अंतराच्या पुणे मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
पिंपरी : पुणे मेट्रोच्या कामासाठी महापालिका भवन येथील १९४ चौरस फूट आणि वल्लभनगर (पिंपरी) येथील २३ हजार ४२५ चौरस फूट क्षेत्रफळाची जागा महामेट्रोला ३० वर्षे भाडेतत्वावर दिली जाणार आहे. त्यासाठी एकूण २ कोटी ९९ लाख ९६ हजार ७६३ रुपये भाडे अपेक्षित आहे.
दापोडीच्या हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपूल या साडेसात किलोमीटर अंतराच्या पुणे मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विविध ठिकाणच्या सुमारे सात जागा यापूर्वीच महापालिकेने मेट्रोच्या ताब्यात दिल्या आहेत. मेट्रोला विद्युत पुरवठा करण्यासाठी रोहित्र, आरएमयू संच बांधणीसाठी महामेट्रोच्या वतीने वल्लभनगर एसटी आगारासमोरील २३ हजार ४२५ चौरस फुटाची जागा मागितली आहे. तसेच, महापालिका भवनातील १९४ चौरस फुटाची जागा विद्युत डीपी बांधणीसाठी मेट्रोने ८ फेब्रुवारीच्या पत्राद्वारे मागितली आहे.
वल्लभनगरची जागा महापालिकेने उमेद मान्यतेवर २६ ऑक्टोबर २०१० रोजी महामेट्रोच्या ताब्यात दिली आहे. महापालिका भवन आवारातील जागेचा भाडे दर १ हजार ८७७ रुपये चौरस फूट आहे. त्यानुसार ३० वर्षांसाठी तीन लाख ६४ हजार १३८ रुपये भाडे होते. वल्लभनगरच्या जागेचे भाडे दर १ हजार २६५ रुपये चौरस फूट आहे.त्याचे ३० वर्षांचे एकूण भाडे दोन कोटी ९६ लाख ३२ हजार ६२५ होते. या एकूण २३ हजार ६१९ चौरस फूट जागेचे ३० वर्षांचे एकूण भाडे २ कोटी ९९ लाख ९६ हजार ७६३ होते. पुणे मेट्रो प्रकल्पात महापालिकेचा एकूण आर्थिक हिस्सा २८६ कोटी ७० लाख रुपयांचा आहे. त्यापैकी जागेचा हिस्सा १८२ कोटी ६० लाख आहे. त्यानुसार वरील दोन्ही जागा महापालिका आर्थिक हिस्सापोटी देणार आहे. त्यास मान्यता देऊन सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला आहे.