पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन वाहनांचा अपघात; एकाचा मृत्यू, एकजण जखमी
By प्रकाश गायकर | Published: March 29, 2024 03:35 PM2024-03-29T15:35:04+5:302024-03-29T15:35:51+5:30
मुंबईहून पुण्याकडे जात असताना चालकाने हयगयीने टेम्पो चालवून समोरून जाणाऱ्या एका वाहनाला धडक दिली
पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावच्या हद्दीत एका आयशर टेम्पोने दुसऱ्या वाहनाला धडक दिली. त्यामध्ये आयशर टेम्पोमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.२८) पहाटे चार वाजता घडला.
छोटेलाल रामजी यादव (वय ४२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राज आमोद कुशवाह (१९, रा. अंबरनाथ, ता. कल्याण, जि. ठाणे) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक शिवा राजू पटवा (२२, रा. अंबरनाथ, ता. कल्याण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज कुशवाह, छोटेलाल यादव आणि शिवा पटवा हे आयशर टेम्पो घेऊन मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होते. शिवा याने हयगयीने टेम्पो चालवून समोरून जाणाऱ्या एका वाहनाला धडक दिली. या अपघातात टेम्पो मधील सहप्रवासी छोटेलाल यादव यांचा मृत्यू झाला. तर राज कुशवाह हे जखमी झाले. शिरगाव पोलिस तपास करीत आहेत.