धक्कादायक! मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वार जखमी; दापोडीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 10:28 PM2020-09-17T22:28:05+5:302020-09-17T22:34:42+5:30
पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे सीएमईच्या गेटसमोरील उड्डाणपुलावर मांजाने तरुणाचा गळा कापला.
पिंपरी : मांजाने गळा खोलवर कापल्याने एक दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. दापोडी येथील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) मुख्य प्रवेशव्दारासमोरील पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर गुरुवारी (दि. १७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
आनंद देशपांडे (रा. रावेत), असे जखमी दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. देशपांडे हे पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. गुरुवारी सायंकाळी ते त्यांच्या दुचाकीवरून पुणे येथून रावेत येथे त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे सीएमईच्या गेटसमोरील उड्डाणपुलावर मांजाने त्यांचा गळा कापला. त्यामुळे त्यांनी लागलीच दुचाकी थांबविली. दरम्यान त्यांच्या पाठीमागे असलेल्या काही वाहनचालकांनी त्यांची वाहने थांबवून देशपांडे यांच्या मदतीला धावून आले. मांजाने गळा कापल्याचे लक्षात येताच मांजा तोडून हटविण्यात आला. तसेच देशपांडे यांना कासारवाडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना निगडी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, याबाबत नागरिकांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. देशपांडे हे रावेत येथे त्यांच्या आईसोबत राहत असून, त्यांचा एक भाऊ त्यांच्या मूळगावी राहत असल्याचे समजते.
.................................................
दोघींना गमवावा लागलाय जीव
कासारवाडी येथे पुणे-मुंबई महामार्गावर नाशिक फाटा येथील जेआरडी टाटा उड्डाणपुलावरून दुचाकीवरून जात असताना मांजाने गळा चिरल्याने डॉक्टर तरुणीला जीव गमवावा लागल्याची घटना ७ ऑक्टोबर २०१८ रोजी घडली होती. डॉ. कृपाली निकम (वय २६, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. धामणगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), असे त्या तरुणीचे नाव होते. तसेच पुणे येथे सुवर्णा मुजूमदार (रा. सिंहगड रस्ता, पुणे) या ७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुचाकीवरून जात असताना मांजाने त्यांचा गळा कापून जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.