नाकाबंदीत वाहतूक पोलिसाला नेले फरफटत , दुचाकीस्वाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 12:06 PM2021-05-29T12:06:50+5:302021-05-29T12:09:14+5:30
पिंपरी चिंचवडमधील मधली घटना
नाकाबंदी दरम्यान कारवाई करीत असलेल्या वाहतूक पोलिसाला धक्का देऊन ५० फूट फरफटत नेले. यात पोलिसाला दुखापत झाली. याप्रकरणी दुचाकीस्वाराला अटक करण्यात आली आहे. वाकड- हिंजवडी रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर वाकड येथे शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
संजय एकनाथ शेडगे (वय ४२, रा. आढाले खुर्द, ता. मावळ), असे अटक केलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शंकर तुकाराम इंगळे (वय ४७), असे दुखापत झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंगळे हे पोलीस हवालदार असून, हिंजवडी वाहतूक विभागात नियुक्त आहेत. फिर्यादी व त्यांचे सहकारी हिंजवडी रस्त्यावर नाका-बंदी दरम्यान कारवाई करीत होते. त्यावेळी आरोपी हा त्याची दुचाकी घेऊन जात असताना त्याला पोलिसांनी बाजूला घेतले. त्याच्याकडे लायसन्स कागदपत्रे याबाबत विचारणा केली. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला धक्का दिला. तसेच गाडी चालू करून पळून जाऊ लागला. त्यावेळी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या गाडीच्या मागील बाजूस फायबरच्या कॅरियरमध्ये फिर्यादीचा हात अडकला. त्यावेळी फिर्यादी त्याला 'थांब थांब' असे म्हणाले. तरीही आरोपीने गाडी न थांबता फिर्यादीला ५० फूट फरफटत नेले. त्यामुळे मार लागून फिर्यादीला दुखापत झाली.
सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरणार तपास करीत आहेत.