पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी भीषण आगीत खाक; सांगवीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 12:32 AM2020-12-22T00:32:43+5:302020-12-22T00:38:07+5:30
आगीने राैद्र रुप धारण केल्याने कारवाईत जप्त केलेल्या ३० ते ३५ दुचाकी खाक
पिंपळे गुरव : पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेल्या ३० ते ३५ दुचाकी अचानक लागलेल्या आगीत खाक झाल्या. नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानातील इमारतीलगत रस्त्याच्या कडेला सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडब्ल्यूडी मैदानातील इमारतीलगत रस्त्याच्या कडेला दुचाकी होत्या. सांगवी पोलिसांनी या दुचाकी जप्त केल्या होत्या. या दुचाकींना सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास अचानक आग लागली. ही बाब तेथील काही नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी लागलीच महापालिकेच्या अग्निशामक दलाला कळविले. त्यानंतर पिंपरीतील संत तुमाराम नगर येथील व ड क्षेत्रीय कार्यालयाचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीने राैद्र रुप धारण केल्याने सर्व दुचाकी खाक झाल्या. दोन्ही बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्निशामक दलाचे सोमनाथ तुकदेव, विठ्ठल घुसे, लक्ष्मण होवाळे, सुशीलकुमार राणे, मंगेश देवगडकर, वाहन चालक शांताराम काटे आदींनी आग आटोक्यात आणली.