दुचाकींची चोरी पिंपरी-चिंचवडमध्ये अन् विक्री खानदेश, मराठवाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 07:04 PM2021-10-16T19:04:51+5:302021-10-16T19:11:31+5:30
पोलिसांनी सापळा लावून घेराव घालून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असून साथीदार शेख व राजभोज यांच्यासोबत त्यांनी दुचाकी चाेरी केल्याचे पोलिसांना सांगितले
पिंपरी : वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमधून चोरी केलेल्या दुचाकी खानदेश व मराठवाड्यात विक्री केल्याचे उघडकीस आले. चोरट्यांकडून एकूण ६० वाहनांसह १९ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चिखली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
गोविंद मुलचंद सोलंकी (वय २५, रा. चिंचवड, मूळगाव देवास, मध्यप्रदेश), संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय २८, रा. मोरेवस्ती, चिखली), सद्दाम अब्दुल शेख (वय २६, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली), आदिनाथ अशोक राजभोज (वय १९, रा. अजिंठा नगर, निगडी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोलंकी व जाधव यांच्याकडे चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून घेराव घालून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असून साथीदार शेख व राजभोज यांच्यासोबत त्यांनी दुचाकी चाेरी केल्याचे पोलिसांना सांगितले.
चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर, सहायक फौजदार आनंद चव्हाण, पोलीस कर्मचारी चेतन सावंत, सुनील शिंदे, बाबा गर्जे, किसन वडेकर, चंद्रशेखर चोरघे, विश्वास नाणेकर, विपूल होले, गणेश टिळेकर, कबीर पिंजारी, नूतन कोंडे, संतोष सपकाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
लॉक तोडून दुचाकीची चोरी
दुचाकीच्या हॅण्डलचे लॉक तोडून आरोपी दुचाकी चोरी करायचे. बनावट कागदपत्रे तयार करून चोरीच्या दुचाकी खासगी बसने किंवा दुचाकी चालवून घेऊन जाऊन खानदेशात व मराठवाड्यात विक्री केल्या. त्यानुसार पोलिसांनी धुळे, जळगाव, चाळीसगाव तसेच लातूर, नांदेड, परभणी, अहमदनगर येथून पोलिसांनी ६१ वाहने जप्त केली. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील ४८ , पिंपरी पोलीस ठाण्यातील चार तर निगडी पोलीस ठाण्यातील एक, असे एकूण ५१ तसेच इतर पाच, असे एकूण ५८ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.