वाकड येथे गांजा, दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल; ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 08:26 PM2021-07-21T20:26:39+5:302021-07-21T20:26:47+5:30
अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून ५९३ ग्रॅम गांजा, देशी विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्या असा एकूण ४३ हजार ९२५ रुपयांचा ऐवज जप्त केला.
पिंपरी : देशी, विदेशी दारू आणि गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांवर वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून ४३ हजार ९२५ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अद्याप अटक केली नाही. म्हातोबानगर झोपडपट्टी येथील एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या टपरीमध्ये देशी-विदेशी दारू आणि गांजा विक्री सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दुपारी सव्वा एक वाजता टपरीवर कारवाई करून ५९३ ग्रॅम गांजा, देशी विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्या असा एकूण ४३ हजार ९२५ रुपयांचा ऐवज जप्त केला.