दोन वर्ष झाली महापालिकेत काय चाललंय समजत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 07:35 PM2019-06-21T19:35:28+5:302019-06-21T19:35:54+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. मात्र, सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरे घेतली जात नाही..
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. मात्र, सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरे घेतली जात नसल्याबाबत सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दोन वर्ष काय चाललय समजत नाही. महापौर प्रश्नोत्तरे का घेत नाहीत. हा प्रश्नच आहे, आमची काही घरची कामे नाहीत, असा प्रश्न सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट सभागृहात उपस्थित केला.
महापालिका सभेत प्रश्नोत्तरे घेत नसल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी आवाज उठविला होता. त्यानंतर आता सत्तारूढ पक्षाच्या नगरसेवकांनीही आवाज उठविला आहे. तसेच आरोग्य आणि पाणी पुरवठा या प्रशासनाच्या कारभाराविरोधात सत्ताधारी नगरसेवकांनीही आवाज उठविला आहे. सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधीपक्षाने प्रशासनाच्या कारभारावर हल्लाबोल केला.
नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, पाणीपुरवठ्यावर प्रश्नोत्तरे घ्या, अशी विनंती महापौरांना केली होती. गंभीर पश्न असताना चर्चा का होत नाही. याची उकल झालेली नाही. महापौरांनी मला बोलण्याची संधी दिली. आमच्या भागात काही लोक महापालिकेचे पाणी टँकर येऊ देत नाहीत. ही बाब गंभीर आहे. चिंचवडमध्ये सर्वाधिक कामे व्हीएम मातेरेला दिली आहेत. ते महापालिकेचे जावई आहेत काय? क्षमता नसेल तर कामे देऊ नका? सभागृहात कोणते विषय आणले जातात. याबाबत आम्हाला माहिती नसते. दोन वर्ष झाली आम्हाला काय चाललय समजत नाही. प्रशासनास केवळ निविदा काढण्यातच रस आहे. आयुक्त दबावाखाली काम करीत आहेत.
उपमहापौर सचिन चिंचवडे म्हणाले, शास्तीकर व्याज दरात सवलतीचे धोरण अवलंबले जात आहे. प्राधिकरण परिसरात अनधिकृत घरे अधिक प्रमाणावर आहे. ही घरे एकत्रित कुटुंबाची आहे. मिळकतकर विभागाने नोटरी वाटणीपत्र ग्राह्य धरावीत. कायदे हे लोकांच्या हितासाठी असावेत. त्यांची गैरसोय करणारे नसावेत. कारण या भागात रजिस्टर कागदपत्रे होत नाहीत.
विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, अनधिकृत बांधकामावरील कारवाईत दुजाभाव केला जात आहे. राजकीय द्वेषातून उपमहापौरांच्या कुटुंबाचे बांधकाम पाडण्यात आले. कारवाईत कोणतेही राजकारण करू नये.
.............