उच्चभ्रू वस्तीत वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार

By admin | Published: June 3, 2016 12:36 AM2016-06-03T00:36:18+5:302016-06-03T00:36:18+5:30

पिंपरी, भाटनगर, नेहरुनगर, विठ्ठलनगर, निगडी ओटा स्कीम अशा झोपडपट्टी भागातील रहिवाशांना वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक या घटना नवख्या नाहीत.

Types of high-flying vehicles | उच्चभ्रू वस्तीत वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार

उच्चभ्रू वस्तीत वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार

Next

पिंपरी : पिंपरी, भाटनगर, नेहरुनगर, विठ्ठलनगर, निगडी ओटा स्कीम अशा झोपडपट्टी भागातील रहिवाशांना वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक या घटना नवख्या नाहीत. झोपडपट्टी दादा, स्थानिक गुंडांच्या टोळक्यांकडून झोपडपट्टीत असे प्रकार घडतात. परंतु प्राधिकरणासारख्या उच्चभ्रू वस्तीत वाहनांची तोडफोडीचे प्रकार घडू लागल्याने नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
उच्चभ्रू, अत्यंत शांत आणि सुरक्षित गणल्या जाणाऱ्या प्राधिकरण परिसराला दोन दिवसांपूर्वीच्या वाहनांच्या तोडफोडीच्या प्रकाराने दहशतीच्या घटनेचे गालबोट लागले. ज्या ठिकाणी झाडाचे पान गळून पडल्याचा आवाजही सहज जाणवतो. अशा पेठ क्रमांक २५,२७,२८ च्या परिसरात दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने धुमाकूळ घातला. रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटारींवर दगडफेक केली. दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान केले. प्राधिकरण, भेळ चौक, हेडगेवार भवन, गणेश तलाव परिसरात ३१ मेच्या रात्री ठिकठिकाणी मोटारींच्या फुटलेल्या काचा पडल्या होत्या. दगड पडल्याने आलिशान मोटारींच्या काचांना तडे गेल्याचे दृश्य पहावयास मिळाले. उद्योजक, व्यावसायिक आणि उच्चपदस्थ अधिकारी यांचे वास्तव्य असलेल्या या प्राधिकरण परिसरात दहशत माजविण्यासाठी असे कृत्य करण्यामागील उद्देश काय असावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्राधिकरणालगतच्या बिजलीनगर भागातही असाच धुमाकूळ घालण्यात आला. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांची अक्षरश: तारांबळ उडाली. गाड्यांची तोडफोड करणारे पसार झाले. कोणीच हाती लागले नाही.
गुरुद्वारा परिसरात यापूर्वी दहशत माजविण्यासाठी महाकालीच्या टोळीकडून वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. महाकालीच्या एन्काउंटरनंतर या भागातील असे प्रकार थांबले. नेहरूनगर,भाटनगर, विठ्ठलनगर, निगडी ओटास्कीम आणि विद्यानगर या झोपडपट्टी भागात, तसेच भोसरी आणि थेरगाव गावठाण परिसरात गेल्या वर्षभरात वाहनांच्या तोडफोडीच्या, तसेच वाहने पेटवून देण्याच्या घटना घडल्या आहेत.
दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडांच्या टोळक्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाईची भूमिका घेतली. अनेक गुंडांवर मोक्का, तडिपारी, एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली. कारवाईमुळे झोपडपट्टी परिसरातील दहशत माजविण्याचे प्रकार कमी झाले. प्राधिकरणासारख्या वसाहतीत आता असे प्रकार घडू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Types of high-flying vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.