अयोध्या दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 09:51 AM2018-11-22T09:51:32+5:302018-11-22T10:11:19+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात शिवनेरीवर त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
पिंपरी चिंचवड - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात शिवनेरीवर त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी शिवनेरी गडाला भेट देण्याचे ठरवले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्श झालेल्या गडावरील माती घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. दरम्यान, उद्धव यांच्या अयोध्या दौ-यासाठी शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, विनायक राऊत, राजन विचारे आदी नेते अयोध्येत दाखल झाले आहेत.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून घमासान सुरू आहे. राम मंदिराबाबत संवाद साधण्यासाठी उद्धव यांनी पाठवलेले निमंत्रण संत-महंतांनी धुडकावून लावले आहे. या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात रस असल्याचा आरोपही आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी केला.
(उद्धव ठाकरे अयोध्येत सभा घेणार नाहीत- संजय राऊत)
दरम्यान, साधू-संतांची सर्वांत मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचे निमंत्रण धुडकावून लावत प्रभू रामचंद्रांवरून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात आखाड्याशी संबंधित एकही संत सहभागी होणार नाही. या दोन्ही संघटना केवळ प्रचार आणि राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत असल्याचा आरोप नरेंद्र गिरी यांनी केला.
शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांपासून फारकत घेत आखाडा परिषदेने २, ५ डिसेंबर रोजी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राम मंदिराचे सर्व पक्षकार एकाच व्यासपीठावर आले तर काहीतरी तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास नरेंद्र गिरी महाराजांनी व्यक्त केला.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने सभेला परवानगी नाकारल्याचे वृत्त फेटाळून लावत सभेसाठी परवानगीच मागितली नसल्याचा दावा शिवसेनेच्या संजय राऊत यांनी केला.