उद्योगनगरी वायफाय ते शांघाय

By admin | Published: February 18, 2017 03:28 AM2017-02-18T03:28:52+5:302017-02-18T03:28:52+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला

Udyanagari Wifi to Shanghai | उद्योगनगरी वायफाय ते शांघाय

उद्योगनगरी वायफाय ते शांघाय

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरात उत्तम आरोग्य सुविधेबरोबरच प्रत्येक नागरिकाचा तीन लाखांपर्यंतचा विमा, मोफत वाय-फाय सुविधा, इस्राइलच्या धर्तीवर शाळा, हिंजवडी ते चाकण मेट्रो, शहर टँकरमुक्त या प्रकारची आश्वासने दिली आहेत. शहर वायफाय करण्याबरोबरच शांघाय करण्याचेही स्वप्न जाहीरनाम्यातून दाखविले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन होणार होते. मात्र, वेळेचे गणित चुकल्याने प्रकाशन लांबणीवर पडले होते. जाहीरनाम्यास उशीर याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर आज पालकमंत्र्यांच्या हस्ते अचानक प्रकाशन करण्यात आले. या वेळी खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, प्रदेशचे सरचिटणीस उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, शहर सरचिटणीस महेश कुलकर्णी, बाबू नायर, नगरसेवक रवि लांडगे, भारती चव्हाण आदी उपस्थित होते.
जाहीरनाम्यात २७ मुद्दे असून आरोग्य, शैक्षणिक, वाहतूक, सुरक्षितता या अनुषंगाने प्रमुख आश्वासनांबरोबरच अन्य बाबींचा समावेश आहे. यामध्ये अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, मेट्रो विस्तार, वैद्यकीय महाविद्यालय, प्राधिकरणाची घरे फ्री होल्ड करणे, नद्यांचे सुशोभीकरण करणे, रस्त्याकडेला सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे, क्रीडांगणे आणि उद्याने विकसित करणे, सुसज्ज भाजीमंडई, कचरा व्यवस्थापनात बदल, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि त्यातून वीजनिर्मिती, प्रत्येक प्रभागात सांस्कृतिक कलामंचाची उभारणी, सर्व जाती-धर्मांसाठी स्मशानभूमी उभारणे या कामांचा समावेश आहे.
महेश लांडगे यांची अनुपस्थिती
भाजपाचा शहर जाहीरनामा प्रकाशित होण्यापूर्वी भोसरीतील जाहीरनामा प्रकाशित झाला. शिवाय शहराच्या जाहीरनामा प्रकाशनास भोसरीचे आमदार महेश लांडगे अनुपस्थित होते. दोन जाहीरनामे प्रकाशित केले आहेत.(प्रतिनिधी)

 शहरात मोफत वाय-फाय सुविधा, तीन लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत, हिंजवडी ते चाकण मेट्रो, पुरेसा पाणीपुरवठा आणि शहर टँकरमुक्त, कार्पेट एरियानुसार मिळकतकराची आकारणी, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय.
 झोपडपट्टी पुनर्वसन, ज्येष्ठांसाठी आनंदी ज्येष्ठत्व योजना राबविणे, सारथीचे पुनरुज्जीवन करणे, सांडपाण्यावर वीजनिर्मिती, तसेच स्वारगेट ते निगडी, स्वारगेट ते कात्रज मेट्रो सुरू करण्यात येणार आहे.

भाजपात गटबाजी नाही. पुण्यात आम्ही सर्व प्रभागांचे जाहीरनामे प्रकाशित केले. पिंपरीतही ते होणार आहेत. तसेच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघनिहाय आणि खासदारांनाही जाहीरनामा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - गिरीश बापट, पालकमंत्री

केंद्र व राज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणून शहर वायफाय करण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, प्राधिकरणातील घरे फ्री होल्ड करणे व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रयत्न करणार आहे. - लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष

Web Title: Udyanagari Wifi to Shanghai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.