उद्योगनगरीचा श्वास कोंडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:40 AM2018-08-24T03:40:35+5:302018-08-24T03:40:57+5:30
वाहतूककोंडी नित्याचीच, विद्यार्थी, नागरिक त्रस्त; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
चिखली : गेल्या चार दिवसांपासून चाकण-तळेगाव रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होत आहे. यामुळे या मार्गाने जाणारे विद्यार्थी तसेच कामगार वर्ग त्रस्त झाले आहेत. सर्वाधिक कोंडीही महाळुंगे (ता.खेड) गावाच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतीकडे जाणा-या एमआयडीसी चौकात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालक, कामगार, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
ह्युंदाई चौक, एच. पी. चौक, महाळुंगे चौक, तसेच महाळुंगे गावाजवळ वाहतूककोंडी सातत्याने होत आहे. या रस्त्यावर लांबलचक कंटेनर, ट्रेलर, डंपर, पाण्याचे टँकर आदी अवजड वाहने ये- जा करत असतात. इतर वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. या गावाजवळ तसेच चौकाजवळ रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने लावण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी ग्रामपंचायत तसेच राज्य मार्गाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे, असा आरोप नागरिक
करत आहे. रस्ता तसेच दोन्ही गावांचे पूल अरुंद आहेत. अवजड वाहनांमुळे या मार्गावर वाहनांना ये-जा करण्यास अडचणी येतात.
या मार्गाचे रुंदीकरण तसेच राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याची घोषणा झाली; पण अजून रस्त्याच्या कामास काही सुरुवात झाली नाही.
उपाययोजना करा
हा रस्ता औद्योगिक वसाहतीचा मुख्य रस्ता आह. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी कडे एम.आय.डी.सी., राज्य मार्ग प्रकल्प विभाग तसेच राजकीय नेत्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी उद्योजक, कामगार, परिसरातील नागरिक यांची आहे. तसेच रस्ता रुंदीकरणाची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या परिसता मोठ्या प्रमाणात उद्योग तसेच कंपन्या आहेत. या ठिकाणी येणा-या कामगारांची संख्याही मोठी आहे. मात्र, सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागतात. परिंणामी कामगारांना वेळेत कामावर पोहचता येत नाही. यामुळे वाहतूक समस्या सोडवण्याची मागणी होत आहे