फी न भरल्याने वर्गात बसण्यास मज्जाव
By admin | Published: June 27, 2017 07:30 AM2017-06-27T07:30:51+5:302017-06-27T07:30:51+5:30
मामुर्डी येथील लायन्स क्लबच्या शाळेत दोन विद्यार्थ्यांना वाढीव फी भरली न भरल्याने बसू दिले जात नसल्याची व शाळेने अनधिकृतरीत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
किवळे : मामुर्डी येथील लायन्स क्लबच्या शाळेत दोन विद्यार्थ्यांना वाढीव फी भरली न भरल्याने बसू दिले जात नसल्याची व शाळेने अनधिकृतरीत्या फी वाढ केल्याची तक्रार देहूरोड येथील एका पालकाने पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे केली आहे. मात्र, संबंधित पालकाने दिलेल्या तक्रारीतील मजकूर खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
देहूरोड येथे राहणारे मेहरबान सिंग तक्की यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची नमनप्रीत कौर (दुसरी) व सरबजितसिंग तक्की (पहिली) ही दोन मुले लायन्स क्लबच्या शाळेत शिकत आहेत. बुधवारी (दि. २१) मुलांना त्यांनी शाळेत पाठविले असता, संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाढीव फी भरली नसल्याने वर्गात बसू दिले नाही. शाळेने अनधिकृतपणे फी वाढ केली असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांच्या नावे गुरुवारी (दि.२२) एक पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेच्या वर्गात बसू न देणे अथवा वगार्बाहेर बसविणे शिक्षण हक्क अधिनियम २००९ कायद्यान्वये बेकायदा असून, अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना वर्गात बसू द्यावे, तसेच शाळेतील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश या पत्रात दिले आहेत. याबाबत लायन्स क्लब एज्युकेशन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संबंधित पालकाने त्यांच्या एका पाल्याची फी भरण्याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही फी भरलेली नाही. संस्थेचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून संस्थेच्या सचिवाने स्वत: फी भरली असून संबंधित पालकाने फी नंतर भरतो असे सांगून अद्यापही भरलेली नाही. संस्था कायमस्वरूपी अनुदानित या पद्धतीने शासनमान्य असून, फी हेच शाळेचे उत्पन्न साधन आहे. शासनाचे सर्व नियम पाळून २५ टक्के आरक्षित तत्त्वावर जिल्हा परिषदेकडून पुरस्कृत केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेले आहेत.