शहरात अनधिकृत १९८ धार्मिक स्थळे, महापालिकेने केली कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 05:15 AM2017-11-09T05:15:02+5:302017-11-09T05:15:20+5:30
शहरातील १९८ अनधिकृत धार्मिक स्थळे असून, महापालिकेने त्यावर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी पुणे-नाशिक महामार्ग येथील अनधिकृत वीट बांधकाम असलेले काळूबाईचे मंदिरावर
पिंपरी : शहरातील १९८ अनधिकृत धार्मिक स्थळे असून, महापालिकेने त्यावर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी पुणे-नाशिक महामार्ग येथील अनधिकृत वीट बांधकाम असलेले काळूबाईचे मंदिरावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे धार्मिक स्थळे उभी केली आहेत. काही अनधिकृत मंदिरे स्थलांतरित केली आहेत. तर, काही ठिकाणी अनधिकृत धार्मिक स्थळे तशीच आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने काही दिवसांपूर्वी अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात कारवाई सुरू केली होती. त्यानंतर महापालिकेनेही कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने बोºहाडेवाडी मधील संभाजीनगर कॉलनी नंबर एक येथील अनधिकृत बांधकामावरदेखील कारवाई करण्यात आली.
शहर परिसरात १९८ अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकी ३४ स्थळांवर कारवाई केली आहे. तसेच १२ बांधकामे संबंधित संस्थांनी स्वत:हून काढून घेतली आहे. उर्वरित धार्मिक स्थळे काढून घेण्यासंदर्भात नोटिसा दिल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू केली आहे.
- प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता