अनधिकृत बांधकामांची गय नाही
By admin | Published: May 10, 2017 04:13 AM2017-05-10T04:13:54+5:302017-05-10T04:13:54+5:30
शहरात यापुढे कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे होऊ देणार नाही. अनधिकृत बांधकामांवर पालिका कारवाई करणारच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : शहरात यापुढे कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे होऊ देणार नाही. अनधिकृत बांधकामांवर पालिका कारवाई करणारच आहे. कर्मचा-यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करावी. कारवाई करण्यास टाळाटाळ करणा-या कर्मचा-यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.
शहरासह राज्यभरातील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे दंड भरून नियमित करण्याचे नवे विधेयक विधिमंडळाने मंजूर केले आहे. मात्र, या निर्णयाचे पत्र महापालिकेला मिळाले नाही. त्या संदर्भात पुढील कार्यवाही सुरू आहे. त्याबाबत अद्याप महापालिका प्रशासनास कोणत्याही प्रकारचे निर्देश मिळालेले नाहीत. सर्रासपणे सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामाविषयी आयुक्त हर्डीकर यांनी कठोर भूमिका घेतली आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
ते म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामे नियमित करण्याविषयी पॉलिसी तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, यापुढे अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याबाबत दक्षता घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर
महापालिका कारवाई करणारच आहे. त्याच्या जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी.’’