अनधिकृत बांधकामांना अभय
By admin | Published: September 13, 2016 01:17 AM2016-09-13T01:17:33+5:302016-09-13T01:17:33+5:30
अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची, बीट निरीक्षक आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे
रहाटणी : अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची, बीट निरीक्षक आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे. ज्यांनी अनधिकृत बांधकामांना अटकाव घातला पाहिजे, त्यांच्याकडूनच अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार घडू लागला असून, अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित झाला आहे.
न्यायालयाचे आदेश आणि महापालिकेने यापूर्वी केलेली अनधिकृत बांधकामाविरुद्धची कारवाई यामुळे भयभीत झालेले नागरिक अनधिकृत बांधकाम करण्यास कचरत आहेत. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले जात आहे. पिंपरीत असेच एक अनधिकृत बांधकाम सुरू आहे. उमेश बिराजदार यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत उघड झाले आहे.
पालिका अधिकाऱ्यांच्या संमतीने पिंपरी येथील साधू वासवानी उद्यानासमोर एक अनधिकृत बांधकाम सुरू आहे. बांधकामधारकास पालिकेने २५ फेब्रुवारी २००५ ला बांधकाम सुरूचा दाखला दिला.
मात्र, संबंधित जागामालकाने दिलेल्या मुदतीत काम सुरू केले नाही. अनेक वर्षे बांधकाम न केलेल्या ठिकाणी सध्या बांधकाम सुरू झाले. पहिला स्लॅबही पडला आहे. बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम परवाना असल्याचा फलक लावला आहे. बांधकाम परवान्याची तारीख २५ फेब्रुवारी २०१५ अशी दाखविली. जेव्हा माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तेव्हा खरा प्रकार समोर आला. २६ आॅगस्ट २०१६ ला मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पालिका आयुक्त, शहर अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर पालिका प्रशासन जागे झाले. (वार्ताहर)