अनधिकृत बांधकाम सुरूच
By admin | Published: September 15, 2016 01:28 AM2016-09-15T01:28:03+5:302016-09-15T01:28:03+5:30
एमआयडीसीने महापालिकेकडे वर्ग केलेल्या चिंचवडच्या संभाजीनगर येथील भूखंडावर महापालिकेने साई उद्यान विकसित केले आहे.
पिंपरी : एमआयडीसीने महापालिकेकडे वर्ग केलेल्या चिंचवडच्या संभाजीनगर येथील भूखंडावर महापालिकेने साई उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात महापालिकेने अनधिकृत बांधकाम केले आहे. अनधिकृत बांधकाम हटवावे, अशी नोटीस एमआयडीसीने महापालिकेला बजावली; मात्र तरीही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आणि बांधकाम हटविले नाही. त्याही पुढे जात महापालिकेने आता साई उद्यानात अनधिकृत बांधकाम पुन्हा सुरू केले आहे. ते त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. थोरात म्हणाले, ‘‘एमआयडीसीने त्यांच्याकडील मोकळे भूखंड महापालिकेकडे वर्ग केले आहेत. संभाजीनगर, चिंचवड येथील २५ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली मोकळी जागा क्रमांक एक हा भूखंड ९ मे १९८५ला महापालिकेकडे हस्तांतरित केला होता. एमआयडीसीच्या या भूखंडावर महापालिकेने साई उद्यान विकसित केले. त्यानंतर येथे व्यायामशाळा, योग केंद्र, मंदिर, माळी हाऊस, स्वच्छतागृह आदी बांधकामांचे नकाशे मंजुरीसाठी महापालिकेकडून अर्ज सादर केला. त्यानंतर डिसेंबर २०१५ला एमआयडीसीकडे हा अर्ज सादर केला. एकूण २३०० चौरस मीटर क्षेत्रफळावरील बांधकामांचे हे नकाशे महापालिकेने तयार केले आहेत. ही बांधकामे महापालिकेने एका महिन्याच्या आत हटविण्यात यावेत, अशी नोटीसही एमआयडीसीने जून २०१५ रोजी बजावली आहे. त्यानंतरही या मोकळ्या जागेवर व्यायामशाळा, योग केंद्र आणि वाचनालयासाठी बांधकाम परवानगी मिळावी म्हणून महापालिकेने एमआयडीसीकडे आॅनलाइन अर्ज सादर केला.
संबंधित बांधकामासाठीची सामासिक अंतरे एमआयडीसीच्या सुधारित बांधकाम नियंत्रण नियमावलीत नसल्याचे पालिकेला कळविले. रीतसर परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे करण्यात आली. बांधकाम हटवावे, अशी नोटीस एमआयडीसीकडून देण्यात आली होती; मात्र तरीही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले.’’ (प्रतिनिधी)