पवना धरणाच्या पात्रात अनधिकृत फार्म हाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 02:08 PM2018-06-30T14:08:30+5:302018-06-30T14:15:16+5:30

धरणाच्या परिसरात लेक व्ह्यूच्या आकर्षणापोटी पुणे-मुंबईतील गुंतवणूकदारांनी जमिनी खरेदीचा सपाटा लावला आहे.

Unauthorized Farm House in Pawana Dam | पवना धरणाच्या पात्रात अनधिकृत फार्म हाऊस

पवना धरणाच्या पात्रात अनधिकृत फार्म हाऊस

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लेक व्ह्यू ’चे आकर्षण : पाटबंधारे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष धरणाच्या आजूबाजूला वीकेंड व फार्म हाऊसच्या नावाखाली आलिशान बंगल्यांची उभारणी प्रशासकीय अधिकारी व पवनाधरणाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष

सचिन ठाकर । 
पवनानगर : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसराला अनधिकृत बांधकामाचा विळखा पडला आहे. धरणाच्या पात्रालगत ‘लेक व्ह्यू’च्या आकर्षणापोटी अवैध बांधकामे, फार्म हाऊसचा ट्रेंड वाढत चालला आहे. धरण परिसर वन व पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली येतो. मात्र, संंबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे अनधिकृत फार्म हाऊस  उभी राहत आहेत. याठिकाणी निर्माण होणारा कचरा व सांडपाणी थेट धरणाच्या प्रवाहात सोडले जात आहे.प्रदूषणाचा परिणाम धरणातील जीवसृष्टीवर होत आहे. 
पवना नदीच्या उगमापासून अतिक्रमणाला सुरवात झाली आहे. पवनानगर येथे नदीवर धरण बांधण्यात आले आहे. या पवना धरणातून पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्यातील नागरिकांना थेट पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरण परिसरात लेक व्ह्यूच्या आकर्षणापोटी पुणे-मुंबईतील गुंतवणूकदारांनी जमिनी खरेदीचा सपाटा लावला आहे. धरणाच्या आजूबाजूला वीकेंड व फार्म हाऊसच्या नावाखाली आलेशान बंगले उभारले जात आहेत. याठिकाणी शनिवार व रविवार पर्यटकाची वर्दळ असते. काही पर्यटक मद्यपान करतात व काचेच्या बाटल्या धरण परिसरात टाकतात. त्यामुळे धरण परिसरात दुर्गंधी वाढू लागली आहे. 
पवना धरणापासून ते बेबडओहळ या परिसरातील नदी प्रवाहाची पाहणी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी प्रत्यक्ष केली. या वेळी नदी प्रदूषणात वाढ करणाऱ्या अनेक बाबी समोर आल्या. पवना धरणाच्या खालील बाजूला असलेल्या नदी प्रवाहात अनेक ठिकाणी पाण्यामध्ये सर्रासपणे जनावरे व गाड्या धुतल्या जातात. त्यामुळे पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत आहे. धरणाच्या खालील भागात काही ठिकाणी टँकर पाण्यामध्ये उभा करून भरला जात असतो त्यामुळे गाड्याचे आॅईल व विषारी पदार्थ पाण्याच्या प्रवाहात मिसळले जात आहेत. या प्रदूषणाची नदीच्या प्रवाहातील जीवसृष्टीला हानी पोहचत आहे. 
....................
अतिक्रमणामुळे पूरस्थिती
पवना नदीपात्राला लागून अनेक बांधकामे उभी राहत असतानाही पवना धरणाचे अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे. परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग व प्लॅस्टिक दिसत आहे. पवना पात्रात बेकायदा बांधकामांमुळे पावसाळ्यात धरणाचे सगळे दरवाजे उघडल्यानंतर पाणी आडते. त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण होत असते. तर नदी पलीकडील गावाचा संपर्क तुटतो. परंतु, प्रशासकीय अधिकारी व पवनाधरणाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Unauthorized Farm House in Pawana Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.