कुदळवाडीत बेकायदा दुकाने

By Admin | Published: December 28, 2016 04:33 AM2016-12-28T04:33:58+5:302016-12-28T04:33:58+5:30

चिखलीतील कुदळवाडी परिसरात साधारण एक हजार ५९८ दुकाने आहेत. त्यापैकी बहुतेक दुकाने व टपऱ्या विनापरवाना, बेकायदापणे उभारण्यात आलेल्या आहेत.

Unauthorized shops in Kudalwadi | कुदळवाडीत बेकायदा दुकाने

कुदळवाडीत बेकायदा दुकाने

googlenewsNext

पिंपरी : चिखलीतील कुदळवाडी परिसरात साधारण एक हजार ५९८ दुकाने आहेत. त्यापैकी बहुतेक दुकाने व टपऱ्या विनापरवाना, बेकायदापणे उभारण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी आगीला प्रतिबंधक कोणत्याही उपायोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वारंवार आगीच्या घटना घडत असल्याने त्याचा लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे.
कुदळवाडी हा परिसर महापालिका हद्दीत येत असून, या ठिकाणी भंगार मालासह इतरही दुकाने आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मात्र, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून जितके लक्ष द्यायला हवे, तितके दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे समोर येत आहे. तसेच, या बेकायदेशीर दुकानांना काही राजकीय माननीयांचा आशीर्वाद असल्याने कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.
परिसरातील भंगार मालाची दुकाने रहिवासी क्षेत्रात आहेत. त्यापैकी अनेक दुकानांना महापालिकेचा उद्योग व्यवसाय परवानाही घेतलेला नाही. त्यामुळे ही दुकाने बेकायदेशीर ठरतात. संबंधित व्यवसायामधून प्रदूषण होत असल्यास त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक असते. या परवानगीनंतर उद्योगधंद्यांची परवानगी दिली जाते. अनधिकृत व्यवसायांवर वेगवेगळ्या विभागांकडून एकत्रित कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, याकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे.
अगदी दाटीवाटीने ही दुकाने वसलेली असून, यातील अनेक दुकाने बेकायदेशीर आहेत. येथील दुकानांमध्ये ज्वलनशील पदार्थांचाही वापर केला जातो. यातून आगीच्या दुर्घटना घडतात. मात्र, दुर्घटना घडल्यानंतरच त्याकडे लक्ष जाते. आतापर्यंत कुदळवाडी परिसरात लागलेल्या एकूण आगीच्या घटनांंमध्ये भंगार मालाच्या दुकानांना लागलेल्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. असे असतानाही अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.
दाटीवाटीने वसलेल्या या परिसरात आगीची घटना घडल्यास अग्निशामक यंत्रणा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्तेही पुरेसे नाहीत. त्यामुळे अग्निशामक दलाचे वाहनही ऐनवेळी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, अशी स्थिती आहे. या ठिकाणी लोकवस्ती वाढत असून, जागा अपुरी पडत आहे. केवळ एखादी दुर्घटना घडल्यानंतरच या भागाकडे लक्ष दिले जाते.
मागील महिन्यात चिखली येथे गॅस स्फोटामुळे लागलेल्या आगीत एकाला जीव गमवावा लागला, तर १९ डिसेंबरला लागलेल्या आगीत सुमारे १० ते १५ भंगार दुकाने खाक झाली. यासह वेळोवेळी लागलेल्या आगीत इतरही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, एखाद्या दुर्घटनेनंतरच संबंधित यंत्रणेचे त्याकडे लक्ष वेधले जाते. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)

कुदळवाडी परिसरात एक हजार ५९८ दुकाने आहेत. ही दुकाने रहिवासी क्षेत्रात असल्याने परवानगी घेताना पर्यावरणासह सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- योगेश कडूसकर, सहायक आयुक्त

Web Title: Unauthorized shops in Kudalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.