पुलाखाली झाेपणारे काका गेले कारमधून घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 05:34 PM2020-02-21T17:34:41+5:302020-02-21T17:35:52+5:30
बेपत्ता असलेल्या वडीलांचा शाेध घेत मुलाने अनेक कष्ट घेतले. अखेर एका संस्थेच्या मदतीने त्यांच्या वडीलांचा शाेध लागला.
वडगाव मावळ : वर्षापूर्वी वडील बेपत्ता झाले. त्यांना शोधण्यासाठी एकुलता एक असलेल्या मुलाने गेल्या वर्षभरापासून गावो गावी चौकशी केली.पोलीस ठाण्यात तक्रार दिली. रेल्वेच्या अपघातात होणारे मृतदेहही तपासले पण बाबांचा शोध लागला नाही. घरचा आधार गेल्याने तो बेचैन झाला. अखेर वृध्दांना आधार देणा-या वृध्द आश्रमाच्या संचालिका प्रिती वैद्य यांच्यामुळे एक वर्षानंतर मुलाला वडील मिळाले.बाबा दिसताच मुलाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.
नाना शंकर मुंढे (वय ६६ रा. पनवेल) असे वृध्दाचे नाव आहे. एकीकडे आई वडील नको असणारी मुले तर दुसरीकडे हरवलेल्या वडिलांच्या शोधात मृतदेह तपासत शोधणार मिनानाथ नाना मुंडे हा मुलगा बाबा दिसताच अश्रू अनावर झाले. घरातील खूप आवडती बैलगाडी चोरीला गेल्याने नाना शंकर मुंडे यांच्या मनावर परिणाम झाला होता. त्या बैल गाडीच्या शोधात ते घरातून निघून गेले. मुलाने वर्षभर वडिलांचा शोध घेतला. त्यासाठी लाखो रूपये खर्च केले.पण ते भेटू शकले नाही.
गेल्या सहा महिण्यापासून ताथवडे, वाकड पुलाखाली नाना मुंडे राहत होते. त्यांच्या घरी भरपूर शेती असून तीन घरे आहेत. पत्नी व एकुलता एक मुलगा असा परिवार असलेले नाना रस्त्यावरून जाणा-या लोकांनी दिलेल्या अन्न पाण्यावर जगत होते. मावळ तालुक्यातील अहिरवडे गावाजवळ असलेले किनारा वृध्द व मतिमंद सेवा ट्रस्टच्या संचालिका प्रिती वैद्य ह्या कार मधुन येत असताना ताथवडे पुलाखाली त्यांना नाना मुंडे दिसले. त्यानी कार उभी करून त्यांची विचारपूस केली.व तुम्ही माझ्या आश्रमात येता का असे विचारले. त्यावेळी त्यांनी नकार दिला. त्यावेळी अंगावर खराब कपडे होते. जवळ दोन पोती होती. एकात कपडे व दुस-यात लोकांनी दिलेले खाद्य पदार्थ. वैद्य यांनी ठरवले की त्यांना आश्रमात न्यायचे तीन दिवस पाळत ठेवली. नंतर पुन्हा त्या ठिकाणी आल्या. त्यांना विश्वासात घेतले. त्यामुळे ते आश्रमात यायला तयार झाले. वैद्य यांनी त्यांना आश्रमात आणले त्यांना आंघोळ घातली कपडे दिले. पंधरा दिवस पोट भर जेवन केल्यानंतर मनाने अस्थिर असणारे बाबा स्थिर झाले. त्यानंतर ते म्हणाले मी पनवेल व सोमाटणे होथे राहतो.
वैद्य यांनी पनवेल पोलिसांना त्यांची माहिती व फोटो पाठवा. पनवेल पोलिस ठाण्याचे हवलदार सचिन जाधव यांनी नातेवाईकांचा शोध घेतला. नाना शंकर मुंडे यांना पोलिसांनी सांगितले की तुमचे वडील सुखरूप आहेत. ते लगेच वैद्य यांच्या आश्रमामध्ये आले वडिलांना पाहताच आनंदअश्रू ढळू लागले. माझ्या बाबांचा शोध तुमच्या मुळे लागला असे म्हणून प्रिती वैद्य यांचे आभार मानले आणि पुलाखाली झोपणारे बाबा कार मधून पनवेलला घरी गेले.