बारस्कर व जरांगे पाटील यांच्यातला वाद अंतर्गत, त्यात सरकार पडणार नाही - उदय सामंत
By प्रकाश गायकर | Published: February 23, 2024 12:34 PM2024-02-23T12:34:58+5:302024-02-23T12:35:25+5:30
आरक्षण टिकणारे असून ते न्यायालयात टिकणारच आहे. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील उपोषण करतायेत
पिंपरी : मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवले आहे. त्यावरून अजय महाराज बारस्कर यांनी त्यांच्यापासून बाजूला जात त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांचा हा अंतर्गत वाद असून यामध्ये सरकारला पडण्याची काही गरज नाही असे स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.
महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून दि. २४ ते २६ दरम्यान मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेशन सेंटर येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी (दि. २३) सामंत बोलत होते. यावेळी त्यांना मराठा आंदोलनाबाबत विचारले असता त्यांनी मनोज जरांगे पाटील व अजय महाराज बारस्कर यांच्यामध्ये सरकार पडणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नाही. कारण इम्पिरिकल डाटा गोळा करण्यात काही अडचणी आल्या होत्या. मात्र, आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या अभ्यासाने हे आरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी सर्व्हे केला आहे. तसेच पूर्ण अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकणारे आहे ते न्यायालयात टिकणारच आहे. मात्र, तरीही मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यामधूनच अजय महाराज बारस्कर व जरांगे पाटील यांच्यात मतभेद झाले आहेत. मात्र, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये सरकारने पडण्याची काहीच गरज नसल्याचे सामंत म्हणाले.
महाराष्ट्रातले पहिले प्रदर्शन
प्रदर्शनाबाबत माहिती देताना उदय सामंत म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये प्रथमच डिफेन्स एक्स्पो होत आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन नवकल्पनांना चालना देणारे आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याचा उद्देश आहे.”