अवांतर वाचनातून ‘फिटे अंधाराचे जाळे’, अंध विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 06:25 AM2018-03-09T06:25:15+5:302018-03-09T06:25:15+5:30
वाचन माणसाला प्रगल्भ बनवते. ‘वाचाल तर वाचाल’ अशी म्हण आहे. मात्र यासाठी पाठ्यपुस्तकातील धड्यांबरोबरच अवांतर वाचनही महत्त्वाचे असते. अंध विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी रुजवण्यासाठी भोसरी येथील पताशीबाई रतनचंद लुंकड अंध शाळेमध्ये ब्रेल लिपीतील साहित्य वाचनासाठी स्वतंत्र तास सुरु करण्यात आला आहे.
- नितीन शिंदे
भोसरी - वाचन माणसाला प्रगल्भ बनवते. ‘वाचाल तर वाचाल’ अशी म्हण आहे. मात्र यासाठी पाठ्यपुस्तकातील धड्यांबरोबरच अवांतर वाचनही महत्त्वाचे असते. अंध विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी रुजवण्यासाठी भोसरी येथील पताशीबाई रतनचंद लुंकड अंध शाळेमध्ये ब्रेल लिपीतील साहित्य वाचनासाठी स्वतंत्र तास सुरु करण्यात आला आहे. अवांतर वाचनाकडे डोळेझाक करणाºया ‘डोळस’ विद्यार्थ्यांसाठीही हा उपक्रम पथदर्शी ठरणार आहे.
भोसरी, पांजरपोळ येथील पताशीबाई रतनचंद लुंकड अंध शाळेत पहिली ते आठवीच्या वर्गात ७२ अंध विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत १९९५ पासून ग्रंथालय सुरू करण्यात आले. सुरुवातीच्या काळात सर्वसाधारण पुस्तके या ठिकाणी उपलब्ध होती. मात्र, कालांतराने नॅशनल असोसिएशन आॅफ ब्लाइंड (नॅब) संस्थेकडून ब्रेल लिपीतील साहित्यसंपदा उपलब्ध होऊ लागली आहे. ब्रेल लिपीतील विविध लेखकांची सुमारे ५०० पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत. मात्र, पाठ्यपुस्तकाखेरीज अवांतर वाचनाकडे कल कमी असतो. त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यातून त्यांची प्रगल्भता वाढावी यासाठी दररोज चाळीस मिनिटांचा अवांतर वाचन वर्ग शाळेमध्ये सुरु केला आहे. २० जानेवारी २०१८ पासून या उपक्रमाला सुरुवात झाली.
वाचताना विद्यार्थ्यांना काही शंका आल्यास शिक्षकांमार्फत त्यांचे निरसन केले जाते. त्यामुळे अंध विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढत आहे. काही मुलांना वाचनाची गोडी असली, तरी ही मुले स्वत: ब्रेल लिपीतील पुस्तके न वाचता इतर डोळस व्यक्तींकडून सर्वसाधारण पुस्तके वाचून घेतात. परिणामी ही मुले ब्रेल लिपीत उपलब्ध असलेल्या ग्रंथसंपदेपासून दुरावत असल्याचे चित्र आहे. स्वत: पुस्तक वाचल्यास ग्रहणशक्ती वाढते. त्यामुळे वाचनाचा तासच सुरू केल्याचे मुख्याध्यापक पांडुरंग साळुंके यांनी सांगितले.
सुटीतही वाचनवर्ग
प्रत्येक वर्गामध्ये मुले एकेक पुस्तक घेऊन त्याचे वाचन करतात. मुलांनी कुठले पुस्तक घेतले, ४० मिनिटांमध्ये त्यांची किती पाने वाचून झाली. त्यांनी पुस्तक पूर्णपणे वाचले का, या सर्व बाबींचे रेकॉर्ड शाळेकडून ठेवले जाते. शाळा वाचनाची नोंद ठेवत असल्याने मुलांपुढे पुस्तक पूर्ण वाचून काढण्याखेरीज पर्याय राहत नाही. सोमवार ते शुक्रवार सायंकाळच्या वेळेत तर शनिवारी व रविवारी सुटी असल्याने दुपारच्या वेळेत वाचन वर्ग घेतला जातो.
शाळांसाठीही पथदर्शी
मोबाइल, इंटरनेटच्या अतिवापरामुळे डोळस मुलांमधील अवांतर वाचनाची गोडी कमी झाली आहे. ग्रहण, आकलन शक्तीबरोबरच प्रगल्भता वाढीसाठी अवांतर वाचन गरजेचे असते. मात्र, आजकालची मुले वाचनापासून दुरावत चालल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत पताशीबाई लुंकड शाळेत वाचन वर्ग सुरू करत एखाद्या विषयाच्या तासाप्रमाणे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अंध मुलांमध्ये अवांतर वाचनाची गोडी वाढत आहे. हा उपक्रम सर्वसाधारण शाळांसाठी पथदर्शी ठरत आहे.