उद्योगनगरीत राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपा पदाधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 06:17 AM2019-02-12T06:17:52+5:302019-02-12T06:18:01+5:30
मावळ लोकसभेच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपाने दावा केला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्यास भाजपा काम करणार नाही, असा इशारा देणारे पत्र नेत्यांना दिले आहे.
पिंपरी : मावळ लोकसभेच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपाने दावा केला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्यास भाजपा काम करणार नाही, असा इशारा देणारे पत्र नेत्यांना दिले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपात जुंपली आहे. शिवसेनेने भाजपाच्या टीकेला उत्तर दिले असून, बारणेंविरोधात बोलणाºया नगरसेवकांचा बोलविता धनी जनतेला ठाऊक आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपी मदत करण्यासाठी आणि मागील निवडणुकीच्या पराभवाचे शल्य मनामध्ये ठेवून वैयक्तिक स्वार्थापोटी पत्रकबाजी सुरू आहे, असा पलटवार शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या दौºयावर आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाच्या नगरसेवकांनी पत्र देऊन बारणे यांच्या उमेदवारीस विरोध दर्शविला आहे. शिवसेनेच्या पराभवास भाजपा कार्यकर्त्यास जबाबदार धरू नये, असेही पत्रकात म्हटले होते. त्याला शिवसेना पदाधिकाºयांनी आज आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे.
देशात शिवसेनेचा नाही, तर भाजपाचा पंतप्रधान होण्यासाठी युती आवश्यक आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास छुपी मदत करण्याचा स्पष्ट हेतू असल्यानेच पत्रकबाजी सुरू केली आहे. निवडणुकीत युती होईल किंवा नाही अजूनही स्पष्ट नाही. युती झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना असे दोनच पर्याय मतदारांच्या समोर राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपावासी झालेल्यांना युती झाल्यास पुन्हा पूर्वाश्रमीच्या पक्षावर निष्ठा दाखवायची आहे. त्यातूनच अशा प्रकारची पत्रके नेत्यांना देऊन ते प्रसिद्धी मिळवत आहेत, असे शिवसेना पदाधिका-यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
निवेदनावर शहरप्रमुख योगेश बाबर, शहर महिला संघटिका ऊर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभाप्रमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभाप्रमुख अनंत कोºहाळे, सरिता साने, अनिता तुतारे, रोमी संधू यांची स्वाक्षरी आहे.
महापालिकेतील अनागोंदी कारभाराकडे लक्ष द्यावे
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार बारणे यांनी मतदार संघातील काम आणि लोकसंपर्क याचा भाजपाने धसका घेतला आहे. यातून हवालदिल झालेल्या एका भाजपा नेत्यानेच नगरसवेकांना ढाल केले आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या नितीन गडकरी यांना भाजपा नगरसेवकांनी शिवसेनेची उमेदवारी कोणाला द्यावी, हा सल्ला देण्यापेक्षा महापालिकेतील चाललेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार याकडे लक्ष घालण्यास भाग पाडणे आवश्यक होते.