बिगारी कामगाराच्या पाच लाखांच्या नोटा जळून खाक
By प्रकाश गायकर | Updated: January 23, 2025 20:45 IST2025-01-23T20:44:03+5:302025-01-23T20:45:17+5:30
५ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि कामगारांचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने या आगीत जळून खाक

बिगारी कामगाराच्या पाच लाखांच्या नोटा जळून खाक
पिंपरी : पिंपळे गुरवमधील काशिद पार्क येथील बांधकाम मजुरांच्या झोपड्यांना गुरूवारी (दि. २३) सकाळी साडे अकराच्या सुमारास आग लागली. यामध्ये पाच झोपड्या जळून खाक झाल्या. तर बांधकामा मजुरांचे पगार करण्यासाठी आणलेली ५ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि कामगारांचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने या आगीत जळून खाक झाले.
पिंपळे गुरव येथील काशीद पार्क हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. या परिसरात बांधकाम मजुरांनी झोपड्या बांधून संसार थाटला आहे. येथील एका व्यक्तीकडे मजुरांचे पगार करण्यासाठी ठेकेदाराने ५ लाख ७० हजार रुपये दिले होते. ते पैसे लोखंडी पेटीमध्ये ठेवले होते. गुरूवारी सकाळी शॉर्ट सर्किट झाल्याने एका झोपडीमध्ये आग लागली. काही क्षणातच या आजूबाजूच्या झोपड्याही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. मजुरांनी एक एक पैसा जमवून बनवलेले सोन्याचे दागिने त्यांनी डब्यामध्ये ठेवले होते. आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की लोखंडी पेटी व डब्यामध्ये ठेवलेले रोख रक्कम व दागिने जळून खाक झाले.
तसेच या आगीत पाच झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. त्यामध्ये मजुरांचा संसार, कपडालत्ता सर्वच जळाले. सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य असे एकूण सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभागातून तीन आणि रहाटणी उपविभागाचे सब ऑफिसर गौतम इंगवले यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा
काशीद पार्क हा अतिशय दाट लोकवस्ती असलेला परिसर आहे. दोन्ही बाजूला मोठ्या इमारती, अरुंद रस्ता आणि रस्त्यावर खासगी वाहनांची पार्किंग यामुळे अग्निशमन विभागाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा आला. खासगी वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.