अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करत दीड लाखांचे दागिने केले लंपास
By नारायण बडगुजर | Published: March 21, 2024 07:03 PM2024-03-21T19:03:19+5:302024-03-21T19:06:53+5:30
तळेगाव दाभाडे येथे बुधवारी (दि. २०) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली....
पिंपरी : दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करत दागिने कागदात बांधून देण्याचा बहाणा करून हातचलाखीने महिलेचे एक लाख ६५ हजारांचे दागिने लंपास केले. तळेगाव दाभाडे येथे बुधवारी (दि. २०) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी महिला रस्त्याने पायी चालत जात होत्या. स्टेशन रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालयाजवळ आल्यानंतर दोन अनोळखी त्यांच्याजवळ आले. आपण पोलिस आहोत, अशी त्यांनी बतावणी केली. त्यानंतर महिलेच्या अंगावरील दागिने सुरक्षित कागदात बांधून ठेवण्यास सांगितले. मंगळसूत्र, पाटली असे एक लाख ६५ हजार रुपये किमतीचे दागिने महिलेने काढून दिले. ते दागिने कागदात बांधून देण्याचा बहाणा करून दोघांनी हातचलाखीने दागिने घेऊन पोबारा केला.