निगडीपर्यंत मेट्रोसाठी केंद्र शासन सकारात्मक, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:35 AM2017-12-23T06:35:58+5:302017-12-23T06:36:18+5:30
पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय शहर विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी साकडे घातले. पुणे मेट्रोला स्वारगेट ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मंजुरी देण्याची मागणी केली.
पिंपरी : पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय शहर विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी साकडे घातले. पुणे मेट्रोला स्वारगेट ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मंजुरी देण्याची मागणी केली. या वेळी वाढीव मेट्रो मार्गाच्या खर्चाची जबाबदारी राज्य शासन व महापालिकेने घेतल्यास केंद्र शासन मंजुरी देण्यास सकारात्मक असल्याचे आश्वासन हरदीपसिंग पुरी यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मेट्रो रेल्वे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्रमांक १ स्वारगेट ते पिंपरीला मान्यता दिली़ पहिल्या टप्प्यामध्येच निगडी भक्ती-शक्ती चौकपर्यंत मेट्रो मार्गिका सुरू व्हावी, ही पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची मागणी आहे. या मागणीचा विचार करून २९ आॅक्टोबर २०१३ च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दि. २ सप्टेंबर २०१४ ला मंजुरीसाठी पाठवला होता. प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी व प्रकल्पासाठी आर्थिक निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी श्रीरंग बारणे यांनी केली.
स्वारगेट ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो रेल्वे सेवा करण्यासाठी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून संबंधित मंत्रालयाशी पत्र व्यवहार केला आहे़ त्याचबरोबर मुख्यमंत्री व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनीही पत्र पाठवून प्रकल्पाचा खर्च उचलण्याची मागणी केली आहे. पिंपरी ते भक्ती-शक्ती या वाढीव मेट्रो रेल्वे मार्गाला होणारा खर्च कोणी करायचा त्यामध्ये महाराष्ट्र शासन, पिंपरी-चिंचवड महापालिका व केंद्रसरकार आपला किती आर्थिक सहभाग देणार यावर चर्चा सुरू आहे. महानगरपालिका या प्रकल्पासाठी खर्च करण्यास तयार असल्यास केंद्र सरकारच्या वतीने तत्काळ मंजुरी मिळणार आहे, असे बारणे म्हणाले.