‘ती’ला जन्म देणा-या मातेची प्रसूती मोफत, महिलांच्या सन्मानासाठी अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 06:02 AM2017-09-03T06:02:53+5:302017-09-03T06:03:12+5:30
लोकमत ‘ती’चा गणपती या उपक्रमाची प्रेरणा घेऊन महिलांच्या सन्मानासाठी सोमाटणे फाटा येथील स्पर्श हॉस्पिटलमधील स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. रुचा वाघ यांनी ‘मुलगी वाचवा अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी : लोकमत ‘ती’चा गणपती या उपक्रमाची प्रेरणा घेऊन महिलांच्या सन्मानासाठी सोमाटणे फाटा येथील स्पर्श हॉस्पिटलमधील स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. रुचा वाघ यांनी ‘मुलगी वाचवा अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत नोंदणी केलेल्या गरोदर महिलांसाठी ही योजना आहे. त्यांनी मुलीला जन्म दिल्यास प्रसूतीचा वैद्यकीय खर्च माफ करणार असल्याचे घोषित केले आहे.
‘लोकमत’च्या वतीने महिलांच्या सन्मानार्थ ‘ती’चा गणपती हा उपक्रम राबविण्यात येता. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून लोकमत पिंपरी कार्यालयात आरतीच्या निमित्ताने लोकमत कार्यालयाच्या भेटीचा योग आला. विविध क्षेत्रांतील महिलांना या उपक्रमात आरती करण्याची संधी देण्यात आली. रोज मान्यवर महिलांच्या हस्ते आरती घेण्यात येते. हा उपक्रम महिलांच्या सन्मानाचा आहेच, शिवाय त्यांचे मनोबल उंचावणारा आहे. असे ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक करून डॉ. वाघ यांनी बेटी बचाव अभियानांतर्गत अनोख्या पद्धतीने मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा निश्चय व्यक्त केला.
मुलीचा जन्म हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता मानली जाते. घरी मुलगी जन्मली की लक्ष्मी आली असे विचार व्यक्त केले जातात. मग दुसरीकडे मुलगी नको म्हणून जन्माला यायच्या अगोदरच तिला मारण्याचे प्रकार घडतात. हे अत्यंत घृणास्पद आहे. स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. कायद्यानेही त्यास प्रतिबंध केला असून प्रसूती व गर्भलिंग निदान कायदा अंमलात आला आहे. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा हट्ट धरल्यामुळे स्त्रीभू्रणहत्येचे प्रकार घडत आहेत. हे थांबवायचे असेल तर चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे. लोकमतने सुरू केलेल्या या संकल्पनेला आणखी व्यापक स्वरूप देण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.’’
‘लोकमत’च्या उपक्रमातून प्रेरणा
डॉ. वाघ म्हणाल्या, लोकमतने सुरू केलेल्या ‘ती’चा गणपती या संकल्पनेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. शहरातील सर्व प्रमुख मंडळांमध्ये ‘ती’च्या वतीने आरती घेण्यात येत आहे. डॉक्टर, वकील आणि अन्य क्षेत्रांत कार्यरत महिलांनीसुद्धा या उपक्रमाची प्रेरणा घेऊन आपापल्या स्तरावर महिलांच्या सन्मानाचे उपक्रम हाती घेण्याचा निर्धार केला आहे. आपणही महिलांच्या सन्मानासाठी काहीतरी करावे, या उद्देशाने असा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे.