खड्ड्यांसाठी मनसेचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:24 AM2018-07-24T01:24:22+5:302018-07-24T01:24:43+5:30
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात तीन तास झोपून आंदोलन
वडगाव मावळ : तालुक्यातील गावोगावच्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, एकही अधिकारी फिरकत नाही. त्यांना जाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते गेले असता, दुपारी बारा वाजेपर्यंत एकही अधिकारी आला नाही. वडगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात तीन तास झोपून आंदोलन केले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ पंचायत समिती, आमदार, खासदार, तसेच राज्यात व केंद्रात सत्ता असून, कोट्यवधीचा निधी दिला, असे जाहीरपणे गावोगावी सांगितले जाते. मग तो निधी खड्डे पाडण्यासाठी वापरला जातो का, असा सवाल त्यांनी केला. तालुक्यात दर वर्षी खड्डे भरण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च दाखवला जातो. तीच वाढीव बिले आणि तोच ठेकेदार हे समीकरण या खात्यात सुरू आहे.
येत्या आठ दिवसांत तालुक्यातील खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता योगेश सोनवणे यांनी फोनवरून खड्डे भरण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. खड्ड्यांमुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. वारंवार किरकोळ अपघात होत आहेत.
आंदोलनात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज गदिया, अशोक कुटे, अनिल वरघडे, संतोष खराडे, योगेश हुलावळे, विजय भानुसघरे, अविनाश जांभुळकर, रवी मानकर, अक्षय जाचक, कुणाल पतंगे, भाऊसाहेब माने, सचिन वाडेकर हे आंदोलनात सहभागी झाले.