अहिराणीसाठी हवी एकजूट

By admin | Published: October 12, 2015 01:01 AM2015-10-12T01:01:06+5:302015-10-12T01:01:06+5:30

अहिराणी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी खान्देशी बांधवांवर आहे. त्यासाठी एकजूट करण्याची गरज आहे. अहिराणी आपली माय आहे

Unite for Ahirani | अहिराणीसाठी हवी एकजूट

अहिराणीसाठी हवी एकजूट

Next

पिंपरी : अहिराणी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी खान्देशी बांधवांवर आहे. त्यासाठी एकजूट करण्याची गरज आहे. अहिराणी आपली माय आहे, जे लोक अहिराणीला विसरतात, ते आईला विसरण्यासारखे आहे, असे मत निवृत्त पोलीस महानिरीक्षक अशोक धिवरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंचाच्या वतीने चिंचवड वाल्हेकरवाडीतील स्रेहसंमेलन, अहिराणी काव्यमैैफल कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर धुळ्याचे उपजिल्हाधिकारी भागवत सैंदाणे, अभिनेते पंढरीनाथ कांबळे, योगेश महाजन, दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते कैलास वाणी, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब पिंगळे, साहित्यिक एम. के. भामरे, प्रकाश पाटील, बापूसाहेब हटकर, रवींद्र माळी, पंकज निकम, शिवदास जोंधळे, उद्योजक अशोक खिंवसरा, संयोजिका विजया मानमोडे, भाजपाचे सरचिटणीस नामदेव ढाके, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, नितीन पाटील, संभाजी बारणे, सुरेश शिरोळे, रवी महाजन, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
धिवरे म्हणाले, ‘‘खान्देशात भेद नाही, असे आपण म्हणतो. मात्र, पश्चिम आणि पूर्व असा भेद आहे. अहिराणी ही कस्तुरी आहे. तिचे संवर्धन करण्याची गरज आहे. आज भाषा संवर्धनासाठी आणि शहरातील नागरिक एकत्रित येण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला. त्यामुळे मला वज्जी आनंद झाला आहे. आपण परदेशात गेलो की, देश भाषेचा अभिमान वाटतो. मात्र, आपण शहरात एकत्र आलो की, एकमेकांशी मराठीत बोलतो. मूळ विसरतो. शहरीकरणात खान्देशातील माणसे अहिराणीत बोलत नाहीत. कारण त्यांना अहिराणी येत नाही, हे वास्तव आहे. आपणच आपल्या भाषेला वाढवायला हवे. आज सर्वत्र खान्देशी माणसांनी प्रगती केली आहे. ही माणसे निरागस असतात. ही भाषा सरळ आहे. त्यामुळे एकजूट करणे गरजेचे आहे.’’
भाषा संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत शिरोळे यांनी व्यक्त केले. तर भाषा वाढावी, यासाठी प्रयत्न करावेत, असे मत पिंगळे यांनी व्यक्त केले. प्रकाश पाटील यांनी भाषा संवर्धनाची जबाबदारी खान्देशी बांधवाचीच असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात विजया मानमोडे म्हणाल्या, ‘‘अहिराणीच्या प्रेमापोटी विविध क्षेत्रांतील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. भाषा संवर्धनाची जबाबदारी आपली आहे. लिहिण्यात, वाचण्यात या भाषेचा वापर करायला हवा. आपण शहरात येऊन माय आणि मातीचे संस्कार विसरत चाललो आहोत, ही दुर्दैवाची बाब आहे. भाषेचे संवर्धन होण्यासाठी आजचा सोहळा आयोजित केला आहे.’’
भटोलाल बागुल, शिवदास बागुल यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित मानमोडे, रोहित मानमोडे, रवींद्र महाजन, सुरेश मानमोडे, छाया भदाने, संध्या साळुंखे, वाल्मिक सोनवणे यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Unite for Ahirani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.