बेशिस्त वाहनचालक, व्यावसायिकांच्या अतिक्रमणाने कोंडतोय बाजारपेठेचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 01:07 AM2018-12-28T01:07:44+5:302018-12-28T01:08:24+5:30
पिंपरी कॅम्पातील कराची चौक ते भाटनगर दरम्यानच्या रिव्हर रोडवर वाहतूककोंडीची दररोजची समस्या आहे. पिंपरीतील मुख्य बाजारपेठ असल्याने कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
- शीतल मुुंडे
पिंपरी : पिंपरी कॅम्पातील कराची चौक ते भाटनगर दरम्यानच्या रिव्हर रोडवर वाहतूककोंडीची दररोजची समस्या आहे. पिंपरीतील मुख्य बाजारपेठ असल्याने कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मुळातच रस्ता अरुंद असताना दुतर्फा होणाऱ्या अवैध आणि बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात रस्ता व्यापला जातो. परिणामी पादचा-यांनाही या रस्त्याचा वापर करणे शक्य होत नाही. तसेच वाहतूककोंडीत भर पडते. लोकमत पाहणीतून ही बाब निदर्शनास आली.
रिव्हर रोडची रुंदी सुमारे १२ मीटर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुचाकी आणि चारचाकीचे पार्किंग असते. टेम्पो, बस आणि अवजड वाहने आल्यास येथे वाहतूककोंडी होते. काही व्यावसायिक दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवतात. काही विक्रेते रस्त्यातच हातगाडी थांबवून व्यवसाय करतात. त्यामुळेही कोंडी होते. सुटीच्या दिवशी ग्राहकांची संख्या जास्त असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा वेळीही बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी होते. मोकाट जनावरेही या रस्त्यावर ठाण मांडून असतात. कराची चौकातून भाटनगरकडे जाण्यासाठी रिव्हर रोडवर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. असे असतानाही काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवितात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांमुळेही या समस्येत भर पडते.
शगुन चौकातून कराची चौक आणि रिव्हर रोडकडे जाताना एकेरी वाहतूक आहे. मात्र, अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने जातात. पिंपरी रेल्वे स्टेशन येथील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलावरून शगुन चौकाकडे येण्यासाठी एकेरी वाहतूक आहे. असे असतानाही बहुतांश वाहनचालक शगुन चौकातून या उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने वाहने चालवून
जातात. त्यामुळे शगुन चौकात
आणि उड्डाणपुलावरही वाहतूक कोंडी होते. कॅम्प परिसर, बाजारपेठ आणि मंडईत येणाºया वाहनचालकांसाठी उड्डाणपुलालगत मंडईजवळ वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. असे असतानाही बहुतांश वाहनचालक त्याचा वापर न करता भर रस्त्यावर वाहने उभी करतात.
शनिवार आणि रविवारी शगुन चौकात आणि रिव्हर रोडवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शगुन चौकातून पिंपरीगाव आणि काळेवाडीकडे जाण्यासाठी वाहतूककोंडीतून मार्ग काढावा लागतो. यात वाहनचालकांचा मोठा वेळ खर्च होतो. तसेच इंधन जळून प्रदूषणही होते. रिव्हर रोडवर भाटनगर येथेही अशीच परिस्थिती असते. भाटनगर येथून इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलावर जाणाºया वाहनांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने येथे कोंडी होते. उड्डाणपुलावर जातानाच वळण असल्याने या कोंडीत भर पडते. उड्डाणपुलावरून चिंचवड लिंकरोडकडे जाणारी वाहने आणि उड्डाणपुलावर जाणारी वाहने यांचा खोळंबा होतो.
- दीपक हाडबे, नागरिक
कॉलेजसाठी अर्धा तास लवकर निघावे लागते. वाहतूककोंडीतून रस्ता काढता काढता वेळ जातो. अनेक वेळा तर वाहने मोठ्या प्रमाणात उभी असतात. पायी जाण्यासाठीही रस्ता मिळत नाही. या वाहतुकीच्या समस्येमुळे अनेक वेळा कॉलेजला जाण्यासाठी उशीर होतो.
- अभिजित करपे, महाविद्यालयीन विद्यार्थी
रस्त्यावरच बेशिस्तपणे वाहने उभी असतात. रस्त्याच्या बाजूला देखील वाहने लावली जातात. त्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना शगुन चौकातून चालणे अवघड होते. रस्त्याने चालताना वाहनाचा धक्का लागण्याची भीती वाटते. रस्त्याच्या बाजूला सर्व दुचाकी लावलेल्या असतात. आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी कसे चालावे, असा प्रश्नच उपस्थित होतो.
- प्रवीण देवकर, ज्येष्ठ नागरिक
शगुन चौकात नेहमीच वाहतूककोंडीतून मार्ग काढत जावे लागते. रस्त्यावर हातगाड्या लावल्या जातात. मुख्य रस्त्यावर जनावरे ठाण मांडून असतात. या सर्वातून मार्ग काढावा लागतो. जनावरे पादचाºयांच्या अंगावरही धावून जातात.
- शकुंतला शिंदे, गृहिणी