विकासातही नागरी सहभाग, दहा लाखांपर्यंतची कामे शहरातील नागरिकांना सुचविता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:29 AM2017-10-23T01:29:27+5:302017-10-23T01:29:38+5:30
पिंपरी - चिंचवड महापालिकेने २०१८ - १९ या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेने २०१८ - १९ या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. त्यासाठी ६ नोव्हेंबरपर्र्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत नागरिकांना त्या त्या क्षेत्रीय कार्यालयात लेखी अर्जाद्वारे कामे सुचविता येतील. आलेल्या योग्य सूचनांचा समावेश पुढील अर्थसंकल्पात केला जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्रपणे तरतूद केली आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी महापालिकेच्या वतीने २००७ - ०८ या आर्थिक वर्षापासून नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव केला जात आहे. त्यानुसार अर्थसंकल्प तयार करताना नागरिकांकडून सूचना मागविण्यात येतात. शहरातील विविध विकासकामे अधिक चांगल्या पद्धतीने व्हावीत, योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि विकासकामांवर लक्ष असावे, अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा या दृष्टीने नागरिकांनी अर्थसंकल्पासाठी सूचना मागविण्याचा उपक्रम पालिकेकडून राबविला जात आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना आपापल्या परिसरातील एखादे
काम अर्थसंकल्पात सुचवता येते. त्यासाठी सुचविलेल्या कामाचा खर्च १० लाख रुपयांपर्यंत असावा
एवढीच एकमेव अट महापालिकेने घातली आहे. कचरा पेटीची
व्यवस्था, पदपथ तयार करणे,
रस्त्यांचे डांबरीकरण, दिवे लावणे, सिग्नल बसविणे, बसस्थानक उभारणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, वृद्धांसाठी बैठक व्यवस्था करणे, बागा किंवा उद्यानातील सुधारणा आदी कामांबाबत नागरिक सूचना करु शकतात. योग्य सूचनांचा समावेश पालिकेच्या अर्थसंकल्पात केला जातो.
>क्षेत्रीय कार्यालयांना सूचना
महापालिकेने २०१८-१९ या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. आगामी अर्थसंकल्पात समावेश करावयाच्या कामांची यादी तयार करण्याचे आदेश आठही क्षेत्रीय कार्यालयांना व मुख्यालयातील सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. तसेच अर्थसंकल्पात कामे सुचविण्यासाठी पालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे.
>६ नोव्हेंबरपर्यंत मुदत
नागरिक सूचना अर्ज आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे अर्ज कार्यालयीन वेळेत नागरिकांना विनामूल्य मिळणार आहेत. नागरिकांनी सुचविलेल्या कामांची शहानिशा करून संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंता विकासकामांचा समावेश अर्थसंकल्पात करतील. त्यानुसार, नागरिकांनी ६ नोव्हेंबरपर्र्यंत क्षेत्रीय कार्यालयात कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.