पिंपरीत बेकायदा आधारकार्ड यंत्रांचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 05:13 PM2018-12-29T17:13:51+5:302018-12-29T17:14:54+5:30
पिंपरीतील एका नागरी सुविधा केंद्रात विनावपरवाना आधार कार्ड देण्याची यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी या केंद्रावर महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला.
पिंपरी : पिंपरीतील एका नागरी सुविधा केंद्रात विनावपरवाना आधार कार्ड देण्याची यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी या केंद्रावर महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. तेथील आधार कार्ड देण्यासंबंधीची यंत्र ताब्यात घेतली. विनापरवाना असे उद्यो करु नयेत, अशी समज केंद्रचालकास देण्यात आली आहे.
पिंपरीतील नागरी सुविधा केंद्र हे राजकीय पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या जवळच्या नातेवाईकाचे आहे. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा निकटवर्तीय असल्याने महापालिका स्तरावर विविध उद्योग करणाऱ्याने केलेला हा उद्योग राजकीय पदाधिकाऱ्याला अडचणीत आणणारा होता. त्यामुळे युद्धपातळीवर हालचाली करून हे प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न झाले. नागरी सुविधा केंद्रावर छापा टाकण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांचे मोबाईल तासाभराच्या अवधीनंतर ‘नॉट रिचेबल’ झाले. नागरी सुविधा केंद्रात काहीतरी गडबड झाली याबद्दलची चर्चा सर्वत्र पसरली. मात्र अधिकृत माहिती देण्याबाबत महसूल विभागातील काही अधिकारी, कर्मचारी टाळाटाळ करु लागले. नागरी सुविधा केंद्रात केवळ तपासणी केली, काही आढळुन आले नाही. असेच भासविण्याचा प्रयत्न झाला.