वडगाव मावळ झाली नगरपंचायत, ग्रामपंचायतीचे सदस्य होणार नगरसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 05:20 AM2018-02-04T05:20:08+5:302018-02-04T05:20:16+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या वडगाव ग्रुप ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीची आता नगरपंचायत जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने शनिवारी अधिसूचना जारी केली.
वडगाव मावळ : गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या वडगाव ग्रुप ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीची आता नगरपंचायत जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने शनिवारी अधिसूचना जारी केली.
मावळ तालुक्यात तळेगाव व लोणावळा नगर परिषद आहे. त्यानंतर तालुक्यात वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली आहे. त्यासाठी भाजपाचे स्थानिक नेते व पदाधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले होते. परंतु, मार्च ते मे २०१८ मुदत संपणाºया ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या यादीत वडगावचे नाव आल्याने सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचा हिरमोड झाला होता.
नगरपंचायत जाहीर झाल्यामुळे पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यवर्ती असलेल्या वडगाव शहराच्या विकासाला वेग मिळणार आहे, अशी माहिती मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. या वेळी गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, अविनाश बवरे, प्रशांत ढोरे, बाळासाहेब घोटकुले, चंद्रशेखर भोसले, संदीप काकडे, प्रवीण चव्हाण, बंडोपंत भेगडे, नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, किरण भिलारे, सोमनाथ ढोरे, अनंता कुडे, किरण म्हाळसकर, तुकाराम काटे, महिंद्रा म्हाळसकर, नारायण ढोरे आदी उपस्थित होते़
नगराध्यक्ष कोण ?
वडगाव ग्रामपंचायतची स्थापना १९२२ रोजी झाली होती. आता त्याचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्याने पहिला नगराध्यक्ष कोण होणार? कोणता पक्ष पहिली सत्ता स्थापन करणार याकडे तालुक्याचे लक्ष्य लागले आहे. वडगाव शहराची पहिली नगरपंचायत निवडणूक आम्ही मित्रपक्षांना बरोबर घेऊन लढणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले. नगरपंचायत झाल्याने हरित पट्टा कमी होऊन चटई क्षेत्रात दुपटीने वाढ होणार असल्याने होऊ घातलेल्या गृहप्रकल्पास सुगीचे दिवस येणार येणार आहेत.