वैष्णवांना गोडी पालखी सोहळ्याची
By admin | Published: July 8, 2015 02:15 AM2015-07-08T02:15:24+5:302015-07-08T02:15:24+5:30
तुकोबारायांच्या पादुका, सव्वातीनशे दिंड्या आणि मोठ्या लवाजम्यासह आषाढी वारीसाठी पंढरीला जाणारा सोहळा म्हणजे पालखी सोहळा. सुरुवातीला निवडक असलेल्या दिंड्या आता सव्वातीनशेवर पोहोचल्या असून,
मंगेश पांडे पिंपरी
तुकोबारायांच्या पादुका, सव्वातीनशे दिंड्या आणि मोठ्या लवाजम्यासह आषाढी वारीसाठी पंढरीला जाणारा सोहळा म्हणजे पालखी सोहळा. सुरुवातीला निवडक असलेल्या दिंड्या आता सव्वातीनशेवर पोहोचल्या असून, महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही दिंड्या सहभागी होत आहेत.
पालखी सोहळ्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील भाविक सोहळ्यात सहभागी होत आहेत. काही जण दिंडीच्या माध्यमातून, तर काही जण वैयक्तिकरीत्या सोहळ्यात सहभाग नोंदवीत आहेत. यंदाच्या वर्षी सोहळ्यात ३२६ दिंड्या असतील.
तुकोबारांच्या पालखी सोहळ्यात सुरुवातीपासून देहूकर फडातील दिंड्या होत्या. या दिंड्या वंशपरंपरेने चालत आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पानथूरकर दिंडी, धोंडोपंतदादा दिंडी, माई दिंडी, गिरिजा टेंभूकर दिंडी, पैठणकर दिंडी, केसरीकर दिंडी, देशमुख दिंडी, पाथवडकर दिंडी या दिंडींचा समावेश आहे. पालखी सोहळ्यातील मार्गावर याच दिंडीचे कीर्तन सोहळाप्रमुखांच्या सूचनेनुसार होत असतात. या दिंडी रथाच्या पुढे आणि मागे चालतात.
अनेक गावांच्या दिंड्या आल्यावर तयार होतो, त्याला फड असे म्हणतात. हा फड चालविणारे असतात. त्यांना श्रीगुरू संबोधले जाते. पूर्वी केवळ फडातीलच दिंड्या असायच्या. कालांतराने सोहळा वाढत गेला. इतरही गावागावांतून दिंड्या सोहळ्यात सहभागी होऊ लागल्या. त्यामुळे सोहळ्यालाही भव्य स्वरूप प्राप्त झाले. आता लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होत आहेत. दर वर्षी दिंड्यांची संख्या वाढतच गेली. २००१ ला सोहळ्यात सुमारे सव्वादोनशे दिंड्या होत्या. २०१० ला पावणेतीनशे दिंड्या झाल्या. हा आकडा २०१३ ला सव्वातीनशेपर्यंत पोहोचला. सोहळ्यातील दिंडी म्हणजे भाविकांसाठी एक कुटुंबच असते. यामध्ये वीणेकरी, टाळकरी, झेंडेकरी, तुळस डोक्यावर घेतलेली महिला, पाण्याचा हंडा घेतलेली महिला असते. पालखी तळाच्या ठिकाणीच दिंडीचा मुक्काम असून, यासाठी तंबूंची व्यवस्था केलेली असते. दिंडी म्हणजे एक शिस्तबद्ध संचच असतो. ठरावीक ठिकाणांशिवाय तो इतरत्र कोठेही थांबत नाहीत.
सध्या नागरिकांकडे कामाच्या व्यापाने वेळ नसला, तरी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे. त्यामुळे एकदा या सोहळ्यात सहभागी झालेल्याला जणू या सोहळ्याची ओढच लागते. सध्याच्या नागरिकांकडे कामाच्या व्यापाने वेळ नसला, तरी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे. त्यामुळे एकदा या सोहळ्यात सहभागी झालेल्या नागरिकाला जणू या सोहळ्याची ओढच लागते. तुकोबारायांची वारी ही केवळ राज्यापुरती न राहता देशाबाहेरही पोहोचली आहे. सध्या सोहळ्यात कर्नाटकातील माई दिंडीसह बेळगावकर, बहिलोहोंगल येथीलही पाच दिंड्या आहेत.