‘व्हॅलेंटाइन डे’: मावळातील गुलाब जोडतोय विदेशातील ‘प्रेम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:58 AM2018-02-01T02:58:15+5:302018-02-01T02:58:35+5:30

गुलाबासाठी थंड हवामान पोषक असल्याने मावळात गुलाबाची शेती बहरू लागली आहे. कार्पोरेट कंपन्यांसह मावळातील सुमारे दोनशे ते तीनशे शेतकरी हरितगृहात फुलशेती करतात. एमआयडीसी, पवन मावळ व इतर भाग मिळून सुमारे एक हजार एकरवर फुलशेती केली जात असून, पुष्पउत्पादनात मावळातील शेतक-यांनी भरारी घेतली आहे.

'Valentine's Day': Mawal Gulab joins 'Love' | ‘व्हॅलेंटाइन डे’: मावळातील गुलाब जोडतोय विदेशातील ‘प्रेम’

‘व्हॅलेंटाइन डे’: मावळातील गुलाब जोडतोय विदेशातील ‘प्रेम’

Next

- विलास भेगडे
तळेगाव दाभाडे : गुलाबासाठी थंड हवामान पोषक असल्याने मावळात गुलाबाची शेती बहरू लागली आहे. कार्पोरेट कंपन्यांसह मावळातील सुमारे दोनशे ते तीनशे शेतकरी हरितगृहात फुलशेती करतात. एमआयडीसी, पवन मावळ व इतर भाग मिळून सुमारे एक हजार एकरवर फुलशेती केली जात असून, पुष्पउत्पादनात मावळातील शेतकºयांनी भरारी घेतली
आहे. मावळच्या कुशीत फुललेला गुलाब ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या निमित्ताने देशातीलच नव्हे तर विदेशातीलही प्रेमाचे रेशीमबंध घट्ट करणारा
ठरत आहे.
फूल उत्पादक कंपन्या व शेतकºयांसाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ हा सुगीचा कालावधी मानला जातो. स्थानिक विक्री व निर्यातीतून सुमारे ६० ते ७० कोटींची उलाढाल होते. वर्षभरातील उलाढालीच्या ५० ते ६० टक्के उलाढाल याच कालावधीत होते. तर वर्षभर गुलाबाचे उत्पादन सुरू असते. परंतु डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत उत्पादित मालाला परदेशात मोठी बाजारपेठ मिळते. भारतातील गुलाब परदेशात नाताळ, मदर्स डे, व्हॅलेंटाइन डे या सणाला नेहमीच भाव खातो.
विदेशात मावळातील गुलाबाने अनेकांना भुरळ घातली आहे. नेदरलँड, हॉलंड, जपान, अमेरिका, बँकॉक, तुर्की, दुबई या देशांमध्ये गुलाब फुलांची निर्यात केली जाते. गुलाबाची बाजारपेठ विस्तारत आहे. डिसेंबरमध्ये थंडी ओसरल्यानंतर गुलाबाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये म्हणून ‘कोल्डरूम’ हा उत्तम पर्याय आहे. निर्यातदार कंपन्यांसह शेतकरीही आता कोल्डरूम बनविण्यास प्राधान्य देऊ लागला आहे. गुलाबाला चांगला भाव मिळत असल्याने तालुक्यातील फूल उत्पादक शेतकºयांना सुगीचे दिवस आले आहेत.
अलीकडच्या काळात मावळातून गुलाबांची निर्यात वाढली आहे. निर्मितीसाठी एका गुलाबाला २ ते ३ रुपये खर्च येतो. तो खर्च वजा जाता विदेशी बाजारात गुलाबांना चांगली किंमत मिळत असल्याचे दिसून येते. सध्या प्रतिगुलाबास १२ ते १८ रुपये भाव मिळत आहे.
सततचा खंडित वीजपुरवठा, कच्चे रस्ते या सारख्या विविध अडचणींवर मात करीत मावळातील फूलउत्पादक शेतकºयांनी यंदा गुलाबाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. आधुनिक शेतीकडे वाढलेला कल, अपार मेहनत आणि कृषी मंडळाच्या हार्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरकडून मिळालेले मार्गदर्शन यातून शेतकºयांनी ही किमया साधली आहे.
हा व्यवसाय मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केला जात असून त्यामधून शेतकºयांना चांगल्या प्रकारे उत्पादन मिळत आहे. तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर फुलशेती करताना दिसत आहे.

बाजारपेठांमधून वाढली मागणी
फुलांची थेट निर्यात करणारे अनेक शेतकरी तालुक्यात आहेत. दिल्ली, मुंबई, गोवा, इंदोर, भोपाळ, चंदीगड, अहमदाबाद, अलाहाबाद, लखनौ, रांची, हैद्राबाद, पाटना, कोलकत्ता, पुणे येथील स्थानिक बाजारपेठांमध्येही अनिर्यातक्षम फुले विक्रीसाठी पाठविण्यात येतात. स्थानिक बाजारपेठांमधून सध्या मागणी वाढली आहे़

प्रतिगुलाब १२ ते १८ रुपये भाव

स्थानिक विक्री व निर्यातीतून सुमारे ६० ते ७० कोटींची उलाढाल

Web Title: 'Valentine's Day': Mawal Gulab joins 'Love'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.