मृतदेह बदलल्याने रुग्णालयात तोडफोड; डाॅक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 08:53 AM2022-10-20T08:53:28+5:302022-10-20T08:53:38+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवारी दुपारी ही घटना घडली
पिंपरी : मृतदेह बदलल्याप्रकरणी वायसीएम रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात काम करणारे डाॅक्टर, कर्मचारी तसेच इतर काम करणारे संबंधित यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवारी (दि. १९) दुपारी ही घटना घडली.
रोहन अशोक गायकवाड (वय ३१, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन गायकवाड यांची आई स्नेहलता अशोक गायकवाड (वय ६१) या मयत झाल्यानंतर वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच कायदेशीर काम न केल्याने मृतदेहांची बदलाबदली झाली. यात दुसऱ्याच मयत महिलेच्या नातेवाईकांना फिर्यादी रोहन यांच्या आईचा मृतदेह दिला. त्यांनी फिर्यादीच्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. संबंधित डाॅक्टरांचा व कर्मचारी यांचा हलगर्जीपणा व कायदेशीर काम न केल्याने फिर्यादीच्या आईच्या मृतदेहाची अवहेलना झाली, असे फिर्यादीत नमूद आहे.
''मृतदेह बदली झाल्याबाबत चौकशी करण्यात येईल. मृतदेह ताब्यात घेणे व देणे या प्रक्रियेत पोलिसांनी हजर राहून शहानिशा करणे आवश्यक असते. मात्र, पोलीस हजर नव्हते. मृतदेह ताब्यात दिल्याबाबत नातेवाईकांकडून लेखी घेतले आहे. त्याबाबतची सर्व प्रक्रिया शवविच्छेदन गृहातील संबंधित कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली. - डाॅ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय, पिंपरी''