चिखलीत घरगुती भांडणातून राडा; ‘सीसीटीव्ही’सह वाहनाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 PM2021-06-19T16:25:56+5:302021-06-19T16:27:23+5:30
सुनेसह तिच्या नातेवाईकांविरोधातही गुन्हा दाखल
पिंपरी : घरगुती भांडणातून सुनेसह तिच्या नातेवाईक व इतर काही जणांनी राडा घालत चारचाकी वाहनाची तोडफोड केली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही तोडले. त्यानंतर सासूला धमकीही दिली. चिखली येथे गुरुवारी (दि. १७) रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली.
नम्रता धनराज कर्पे (रा. चिखली), मयूर बनकर, राहुल बनकर, अजय बनकर, संजय बनकर, आप्पा गोरे, पांडुरंग वाडकर (सर्व रा. उरळी कांचण, पुणे), अशी आरोपींची नावे आहेत. निर्मला मधुकर कर्पे (वय ५६, रा. देहू-आळंदी रस्ता, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १८) फिर्याद दिली आहे.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नम्रता कर्पे ही फिर्यादी निर्मला कर्पे यांची सून आहे. आरोपी नम्रता आणि तिचा पती हे दोघेही विभक्त राहतात. आरोपी नम्रता आणि तिचा पती यांच्यात वाद झाला. यातून चिडून जाऊन आरोपी हे नम्रता हिच्या सासू असलेल्या फिर्यादी निर्मला यांच्या घराबाहेर एकत्र आले. त्यावेळी मोठमोठ्याने आरडा-ओरडा करण्याचा आवाज आल्याने फिर्यादीने त्यांच्या घराच्या खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांची सून नम्रता तसेच तिच्या नातेवाईकांसह इतर आरोपी घराबाहेर उभे होते. सिमेंटचे गट्टू व लोखंडी रॉडने आरोपींनी गेटचे लॉक तोडून ते सर्वजण फिर्यादीच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आले. तेथे सिमेंटचे गट्टू, विटा व लोखंडी रॉडने चारचाकी वाहनाच्या काचा फोडून वाहनाचे नुकसान केले. तसेच दरवाजावर दगड मारून दरवाजावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान केले. तुम्ही खाली या, तुमचे नरडे चिरतो, अशी धमकीही आरोपींनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक शाम मस्के तपास करत आहेत.