Pimpri Chinchwad Crime | पैसे मागितल्याने ‘सलून’ची तोडफोड; चिखलीत दुकानदाराला मारहाण
By नारायण बडगुजर | Published: March 23, 2023 04:32 PM2023-03-23T16:32:17+5:302023-03-23T16:32:33+5:30
चिखली येथे ट्रेंडस कटींग सलून दुकानामध्ये ही घटना घडली...
पिंपरी : सलूनच्या दुकानामध्ये चेहरा फ्रेश करण्यास सांगितले. त्यानंतर सलून व्यावसायिकाने २० रुपये मागितले. त्या कारणावरून सलून व्यावसायिकाला मारहाण केली. तसेच दुकानाची तोडफोड करून दुकानातून एक हजार ४०० रुपये जबरदस्तीने चोरून घेतले. त्यानंतर धमकी दिली. शरदनगर, चिखली येथे ट्रेंडस कटींग सलून दुकानामध्ये मंगळवारी (दि. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
भुषण लक्ष्मीकांत महाले (वय २६, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २२) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर (वय २२) आणि आदित्य शिंदे (दोघेही रा. शरदनगर, चिखली) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आदित्य शिंदे याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शरदनगर, चिखली येथे कटिंग सलूनचे दुकान आहे.
फिर्यादी हे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या सलूनमध्ये दोन कामगारांसह होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. आदित्य शिंदे याने फिर्यादीला त्याचा चेहरा फ्रेश करून देण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने आदित्य याचा चेहरा फ्रेश करून दिला. त्यानंतर त्याचे शुल्क म्हणूनफिर्यादीने आदित्य याच्याकडे २० रुपये मागितले. तू माझ्याकडे पैसे मागतोस का, तू आम्हाला ओळखत नाही का, थांब तुला दाखवतो, असे म्हणून आदित्य याने फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच आदर्श लुडेकर याने दुकानाच्या बाहेर जाऊन एक लोखंडी पाईप आणला. तो पाईप आदित्य शिंदे याच्याकडे दिला. आदित्य याने पाईपने फिर्यादीच्या सलून दुकानातील काचा फोडून, ट्राॅली तोडून, मशिनी तोडून नुकसान केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या दुकानातील पैशांच्या ड्राॅवरमधून रोख एक हजार ४०० रुपये जबरदस्तीने चोरून घेतले. पोलीस तक्रार केली तर तुझी विकेट टाकीन, अशी धमी आदर्शन लुडेकर याने दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.