रिल्ससाठी अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड, एकाला धमकी देत लुटण्याचाही प्रयत्न 

By नारायण बडगुजर | Published: June 24, 2024 05:30 PM2024-06-24T17:30:50+5:302024-06-24T17:36:51+5:30

वाकड येथील लोंढे वस्तीतील गणेश नगरमध्ये सोमवारी (दि. २४) रात्री सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे वाकड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला....

Vandalism of vehicles by minors for reels in Wakad, attempt to rob one under threat  | रिल्ससाठी अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड, एकाला धमकी देत लुटण्याचाही प्रयत्न 

रिल्ससाठी अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड, एकाला धमकी देत लुटण्याचाही प्रयत्न 

पिंपरी : दोन ते तीन अल्पवयीन मुलांनी दहशत पसरविणे आणि रिल्स तयार करण्याच्या हेतूने हातात कोयते घेऊन परिसरातील वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करताना एका व्यक्तीने पाहिल्याने त्यालाही धमकी देत लुटण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वाकड येथील लोंढे वस्तीतील गणेश नगरमध्ये सोमवारी (दि. २४) रात्री सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे वाकड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. 

या प्रकरणी तिघांच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोघांना वाकड पोलिसांच्या तपास पथकाने अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील गणेशनगरमध्ये तिघांनी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. पाच कार, दोन रिक्षा, एक टेम्पो, दोन दुचाकी, इत्यादी वाहनांची तोडफोड केली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये एक मुलगा कोयत्याने वाहनांच्या काचा फोडत आहे. तर दुसरा मुलगा तोडफोड केल्याचा व्हिडीओ बनवत आहे. या तोडफोडीचे मुलांनी दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर रील्स बनवले आहेत. पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. 

रिल्ससाठी तोडफोड...

सोशल मीडियावर रिल्स टाकायचे, हे रिल्स पाहून लोकांनी आपल्याला भाई म्हटले पाहिजे, लोक आपल्याला घाबरायला हवेत, या हेतूने अल्पवयीन मुलांनी वाहनांची तोडफोड केली. गुन्हेगारीचे रिल्स टाकले की लाईक आणि शेअर करण्यासह जास्त ‘व्ह्यूज’ मिळतात, दहशत पसरते, या मानसिकतेतून या मुलांनी रिल्ससाठी वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. 

अल्पवयीन मुलांकडे कोयते येतात कोठून?

शहरातील अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे. रात्री चोरी, हाणामारी तसेच वाहनांची तोडफोड करण्यात अल्पवयीन मुले असल्याचे पोलिस तपासात अनेकदा समोर आले. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी असते, कोणी अनधिकृतपणे शस्त्र बाळगत असेल तर त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात येते. असे असताना अल्पवयीन मुलांकडे शस्त्र कसे येतात, अल्पवयीन मुलांना शस्त्र पुरवून त्यांच्याकडून गुन्हे करून घेण्याचे एखादे रॅकेट शहरात सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाई होण्याची हौस....

आपल्या परिसरात आपल्याला भाई म्हणून ओळखले गेले पाहिजे, सर्वांनी आपल्याला घाबरायला हवे, यासाठी अनेक अल्पवयीन मुले गुन्हेगारीची वाट पकडत आहे. या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांकडून मध्यंतरीच्या काळात काही प्रयत्न केले गेले. मात्र, शहरातील अनेक अल्पवयीन मुले आपल्या परिसरातील गुन्हेगार, गुंड लोकांच्या संपर्कात येऊन भाई बनत असल्याचे चित्र आहे.

वाकडमध्ये अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वाहांनाची तोडफोड केली आहे. दहशत पसरविणे आणि सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी त्यांनी वाहनांची तोडफोड केली आहे. दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

- निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड

 

Web Title: Vandalism of vehicles by minors for reels in Wakad, attempt to rob one under threat 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.